प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बेळगाव भाजीमार्केटमधुन विविध शहरांना होणारा भाजीपाला पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱयांचे कंबरडे मोडले आहे. अशातच मिळालेले पिक भाजीमार्केटमध्ये विक्री केले असता कवडीमोल दर मिळत आहे. मात्र कवडीमोल दराने खरेदी केलेली भाजीची विक्री चारपट दराने करण्यात येत असून किरकोळ भाजी विपेत्यांची चंगळ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहतुक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. रोजच्या जेवणाच्या ताटातील भाजी -भाकर उपलब्ध व्हावी याकरिता रेशन धान्य आणि भाजीपाला विक्रीसाठी मुभा देण्यात आली आहे. एपीएमसी बाजारपेठेत भाजी खरेदी विपेत्यांची गर्दी होत असल्याने चार ठिकाणी भाजीपाला विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र पर राज्यात आणि विविध शहरांना करण्यात येणारा भाजी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. केवळ शहर मर्यादित भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. तसेच हॉटेल, खानावळ बंद असल्याने भाजीची उचल होत नाही. त्यामुळे भाजीपाला दुकानांमध्ये सडू लागला आहे. याची दखल घेऊन भाजीपाला आणू नका, अशी विनंती शेतकऱयांना काही विपेत्यांनी केली आहे. त्यामुळे विक्रीसाठी तयार झालेला भाजीपाला शेतातच सडू लागला आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून तसेच भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असल्याने भाजीच्या पिकावरच ट्रक्टर फिरविला आहे. भाजीपाला बाजारपेठेत नेल्यानंतर त्या ठिकाणी कवडीमोल दराने विक्री होत आहे. विक्री झालेल्या रक्कमेतून मजुरी आणि वाहतुक खर्चही मिळत नाही. त्यामुळे भाजी विक्रीसाठी बाजारपेठेत नेण्याचे शेतकऱयांनी बंद केले आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी असल्यामुळे शेतकऱयांनी भाजीपाला बाजारपेठेत नेण्याकडे पाठ फिरविली आहे. मात्र शहराजवळ असलेले शेतकरी तात्पुरते निर्माण करण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाला नेत आहेत. पण त्या ठिकाणी देखील दर मिळत नाही. भाजी खराब करण्या ऐवजी मिळेल त्या दराने भाजी विक्रीसाठी कमिशन एजंट प्रयत्न करीत आहेत. सध्या भाजीमार्केटमध्ये किरकोळ भाजी विपेते खरेदी करीत आहेत. मात्र कमिशन एजंटनी ठरविलेल्या दराप्रमाणे विक्री होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे किरकोळ भाजी विपेते कमी दराने भाजी उचल करीत आहेत. खरेदी केलेली भाजी हातगाडीच्या माध्यमातून गल्लो गल्ली फिरून विक्री करीत आहेत. जीवनावश्यक साहित्य म्हणून शासनाने हातगाडीद्वारे भाजी विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण याचा गैरफायदा घेण्याचा प्रकार भाजी विपेत्यांनी चालविला आहे. खरेदी केलेल्या चार पट जादा दर घेऊन भाजी विक्री करण्याचा प्रकार सुरू आहे.
शेतकरी-ग्राहक दोघांनाही नुकसान
वास्तविक पाहता शेतकऱयाला दर मिळत नाही. तर संचारबंदी असल्याने मिळेल त्या दराने नागरिकांना भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. एकीकडे भाजीपाला शेतावरच कुजुन खराब होत आहे. मात्र दुसरीकडे लॉकडाऊन असल्याने भाजीपाल्याचा तुटवडा असल्याचे सांगून चार पट दराने भाजी विक्री करणाऱया किरकोळ भाजी विपेत्यांची चंगळ चालविली आहे.
जिल्हा प्रशासनाने आवश्यक कारवाई करावी
जीवनावश्यक साहित्याची जादा दराने विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे. पण गल्लोगल्ली फिरणाऱया भाजी विपेत्यांनी कोणताच फलक हातगाडीवर लावला नाही. प्रशासनाने दिलेला पास खिशात ठेवला जातो. तसेच गाडीवर कोणताच क्रमांक देखील लिहिलेला नाही. भाजी विपेत्याला नाव विचारले असता व्यवस्थित माहिती देत नाहीत. त्यामुळे तक्रार कशी नोंदवायची हा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. तसेच भाजीचे दर जाहीर केले जात नसल्याने याची माहिती देखील नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. भाजीचा तुटवडा आहे असे सांगून जादा दराने विक्री करण्याचा सपाटा भाजी विपेत्यांनी चालविला आहे. त्यामुळे याची माहिती घेऊन लॉकडाऊन काळात नागरिकांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.








