नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देश कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रबळ लाटेशी झुंज देत आहे, परंतु लवकरच कोरोनाची तिसरी लाट थांबण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. काही राज्ये आणि मेट्रो शहरांमध्ये प्रकरणे कमी आणि स्थिर होऊ लागली आहेत. यामध्ये लसीकरणाचा मोठा वाटा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे कोरोनाच्या तिसऱया लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. 15 फेब्रुवारीनंतर देशातील दररोज कोविड-19 रुग्णांमध्ये होणारी घट लक्षणीय असेल, असे सरकारमधील अधिकृत सूत्रांनी सोमवारी सांगितले
गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट झालेली दिसून येत आहे. दैनंदिन साडेतीन लाखांपर्यंत पोहोचलेले रुग्ण रविवारपर्यंत पुन्हा 3 लाखांपर्यंत खाली आले आहेत. सद्यस्थितीत ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी त्यावर लगाम ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात सध्या तिसरी लाट समूह प्रसाराच्या टप्प्यात आहे. अनेक महानगरांमध्ये संसर्गाची नवीन प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कोरोनाची ही लाट मेट्रो शहरांनंतर काही आठवडय़ात लहान शहरे आणि खेडय़ांमध्ये सरकेल आणि हळूहळू संपुष्टात येईल. पुढील महिन्याच्या मध्यानंतर रुग्णसंख्या कमी होईल, असा दावा तज्ञांच्या अभ्यासाअंती करण्यात आला आहे.
दिवसभरात देशात 3.06 लाख नवे रुग्ण
देशात एका दिवसात कोरोनाचे 3 लाख 06 हजार 064 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील संक्रमितांची संख्या 3 कोटी 95 लाख 43 हजार 328 इतकी झाली आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या 22 लाख 49 हजार 335 झाली आहे. 241 दिवसांतील सक्रिय प्रकरणांचा हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 24 तासांत देशात आणखी 439 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तसेच एकंदर मृतांची संख्या 4 लाख 89 हजार 848 वर पोहोचली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 93.07 टक्क्मयांवर आला आहे.
लसीकरण मोहिमेला मिळतेय यश
देशात कोविड-19 विरोधी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. लसीचे दोन्ही डोस देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येला दिले गेले आहेत. आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 162 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. तसेच 15 ते 18 वयोगटातील 4 कोटी 15 लाख मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे.









