प्रतिनिधी/ खानापूर
राज्य शासनाच्या आदेशाला खानापूर तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून तिसऱया रविवारीही लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी झाला आहे.
दर रविवारी खानापूरसह लेंढा गावातही आठवडी बाजार भरतो. या दोन्ही ठिकाणी रविवारी आठवडी बाजार असूनही सर्वत्र सन्नाटा पसरला होता. दोन्ही ठिकाणची स्थानिक व्यापारपेठ पूर्णतः बंद होती. शिवाय बाजारासाठी ग्रामीण भागातून एकही इसम आला नाही. तालुक्यात नंदगड, बिडी, पारिश्वाड, इटगी, गंदिगवाड, जांबोटी आदी मोठय़ा गावातही लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी झाला. तालुक्यातून जाणाऱया बेळगाव-पणजी व्हाया लोंढा-रामनगर या महामार्गासह बेळगाव-पणजी व्हाया चोर्ला, जत-जांबोटी, लिंगनमठ-रामनगर, खानापूर-अळणावर, हेम्माडगा-शिंदनूर आदी राज्यमार्गांवरही वाहनांची वर्दळ बंदच होती. या सर्व महामार्गांवर अधून-मधून एखाद दुसरे वाहन जात असल्याचे चित्र होते. खानापूर शहरात सर्व गल्ल्यांतील मार्ग निर्मनुष्य झाले होते. ग्रामीण भागातील जनतेनेही शेतीवाडीत काम करून लॉकडाऊनचा दिवस घालविला. लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद ठेवली होती.
गेल्या दहा दिवसांपूर्वी तालुक्यातील करविनकोप्प गावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तो बीएसएफ जवान असून रजेवर आला आहे. रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या अंदाजे 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. अद्याप त्यापैकी 28 जणांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहेत.
आता गणेश चतुर्थीचे दिवस जवळ येत असल्याने खानापूर तालुक्यातील गोव्यामध्ये स्थायिक असलेले लोक सणासाठी गावी येण्याची शक्यता आहे. अशा लोकांवर कडक नजरा ठेऊन त्यांना वेळीच क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. तालुक्यातील बरेच जण शेजारच्या महाराष्ट्र राज्यातही नोकरी-व्यवसायासाठी स्थायिक आहेत. ते गणेशचतुर्थीसाठी गावी परतण्याची शक्यता असल्याने तालुक्यावर कोरोनाचे संकट ओढवू नये यासाठी प्रशासनाने वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे.









