प्रतिनिधी / बेंगळूर
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे वेतनवाढीची मागणी करणारे राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यातील तिढा अद्याप सुटलेला नाही. बुधवारी कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने राज्यभरात बससेवा बंद केली गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. बसस्थानकावर दाखल झालेल्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. वेतनवाढ आणि परिवहन कर्मचाऱयांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिल्याच्या कारणास्तव परिवहन कर्मचाऱयांनी बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान गुरूवारीही संप सुरूच राहणार असल्याचे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी राज्य सरकारने खासगी वाहनांची व्यवस्था केली असली तरी प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. परिवहन कर्मचारी कामावर हजर राहणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर खासगी वाहनांनी मुक्तपणे बेंगळूरच्या केएसआरटीसी बसस्थानकात प्रवेश केला. बीएमटीसी बसेसची वाहतूक बंद असल्याने कामावर जाणाऱया कर्मचाऱयांनी रिक्षांचा आधार घेतला तर काहींना चालतच कामावर जावे लागले. सरकारी बस वाहतूक बंद करण्याबाबत कर्मचारी संघटनांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. बेमुदत बंदकडे लक्ष न देता बससेवा सुरू ठेवलेल्या बस चालकांचा सार्वजनिकांनी शाल, हार घालून सत्कार केला.
संपामुळे रस्त्यावर बसेस न धावल्याने दररोज कामावर जाणाऱयांना पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी मोठी धडपड करावी लागली.. मॅजेस्टिक सॅटेलाईट बसस्थानकासह शहरातील प्रमुख बसस्थानकात प्रवाशी नसल्याने शुकशुकाट पसरला होता. बेंगळुरात 30 लाख कर्मचारी बीएमटीसी बसेसवर तर 70 ते 80 लाख प्रवाशी इतर विभागाच्या बसेसवर अवलंबून आहेत. मात्र, बुधवारपासून परिवहन कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने त्यांनी खासगी वाहनांचा आधार घेतला. दरम्यान, विविध भागात खासगी वाहनांना मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे व बेंगळुरात मेट्रो सेवा वाढविण्याचा निर्णयही सरकारने घेतला.
परगावी जाण्यासाठी बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना खासगी वाहनांचाच अवलंब करावा लागला. बेंगळूर, कोलार, मंडय़ा, हुबळी, बागलकोटसह अनेक जिल्हय़ातील प्रवाशांनी खासगी बस, रिक्षा, कॅबचा आधार घेतला. दररोजच्या सरासरीच्या तुलनेत बुधवारी प्रवाशांची संख्या कमीच होती. कोप्पळ, तुमकूर, हावेरी, मंडय़ा, बागलकोट, चित्रदुर्ग रामनगर, नेलमंगल, यादगिरी, कोलारसह राज्यातील सर्व जिल्हय़ात परिवहन कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने सरकारी बस वाहतूक बंद होती.
सरकारकडून पर्यायी व्यवस्था : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी
परिवहन कर्मचाऱयांनी 9 मागण्यांपैकी 8 मागण्या पूर्ण करूनही बुधवारपासून राज्यभरात बससेवा बंद ठेऊन संप पुकारला आहे. गुरुवारीही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय परिवहन कर्मचारी संघाने घेतला आहे. पण संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी सरकारने पर्यायी व्यवस्था केली. त्यामुळे सार्वजनिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे.
कर्मचाऱयांनी अशापद्धतीने संप पुकारल्यास संस्थेला नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाऱयांचे वेतन देण्यास समस्या निर्माण होतात. याचा कर्मचाऱयांनी विचार करावा, असेही ते म्हणाले.
मार्चमधील वेतन रोखणार
सरकारी बस वाहतूक बंद केलेल्या कर्मचाऱयांना धडा शिकविण्याचा विचार सुरू असून संप पुकारलेल्या परिवहन कर्मचाऱयांचे मार्च महिन्यातील वेतन रोखून ठेवण्याचा विचार राज्य सरकार करते आहे. चारही परिवहन निगमांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. सरकारच्या मागणीकडे दुर्लक्ष करून संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या प्रत्येक कर्मचाऱयाचे वेतन रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तब्बल 17 कोटींचे नुकसान
परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे परिवहन खात्याला एका दिवसात तब्बल 17 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. केएसआरटीचे 7 कोटी, बीएमटीसीचे 3 कोटी, वायव्य वाहतूक मंडळाचे 3.5 कोटी आणि ईशान्य वाहतूक मंडळाचे 3.5 कोटी असे एकूण 17 कोटी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
बस बंदमुळे आजच्या परीक्षाही रद्द
बेळगाव : वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी परिवहन कर्मचारी बुधवारपासून बेमुदत संपावर आहेत. परंतु बुधवारी दिवसभरात कर्मचाऱयांच्या मागण्या मान्य न झाल्याने गुरुवारीही संप चालूच राहणार आहे. बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याने गुरुवारी होणाऱया चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गुरुवार दि. 8 रोजी होणाऱया परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द झालेल्या पदवीच्या परीक्षा शुक्रवार दि. 16 रोजी, पदव्युत्तर परीक्षा मंगळवार दि. 27 रोजी तर एमबीएच्या परीक्षा दि. 30 रोजी होणार आहेत. सलग दोन पेपर पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून महाविद्यालयांना देण्यात आली आहे.
सरकारकडून पर्यायी व्यवस्था
- 1)कोरोना काळात सरेंडर केलेल्या खासगी प्रवाशी वाहनांना एप्रिल महिन्याच्या कालावधीकरता शुल्कात सवलत
- 2)संपूर्ण राज्यात खासगी टॅक्सी, मिनी बस, खासगी बस मालकांच्या संघासोबत यापूर्वीच चर्चा केली असून योग्य वाहतूक व्यवस्था पुरविण्याची मागणी केली आहे
- 3) बसस्थानकात खासगी बसेसना थांबण्यास आणि तेथूनच वाहतूक करण्यास संधी देण्यात आली आहे.
- 4) लांबवर जाणाऱया प्रवाशांना सोयीसाठी बेंगळूरहून बेळगाव, गुलबर्गा, बिदर, कारवार, विजापूर, शिमोगा, म्हैसूर आदी ठिकाणी अधिक रेल्वे सोडण्याची मागणी रेल्वे खात्याकडे केली आहे.
- 5) बेंगळूर शहरात प्रवाशांना पर्यायी व्यवस्था पुरविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मेट्रो रेल्वे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.