तुटपुंजे वेतन व असुरक्षित नोकरी : आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /फोंडा
राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत विविध विषय शिकविणाऱया तासिक (लॅक्चर बेसीस) शिक्षकांनी योग्य वेतन व सेवेत कायम करण्याची मागणी केली आहे. गेली अनेक वर्षे तासिक शिक्षक म्हणून अत्यंत तुटपुंज्या वेतनावर ते काम करतात. सरकारने त्यांना आतापर्यंत आश्वासनांवर झुलवत ठेवले आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष न घातल्यास आता पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अखिल गोवा हायस्कूल लेक्चर बेसीस टिचर्स संघटनेच्या बॅनरखाली फोंडा येथील क्रांती मैदानावर पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. सरकारला आपल्या या मागण्यांचे लेखी निवेदन सादर केल्याचे या शिक्षकांनी सांगितले. गोव्यातील विविध सरकारी शाळांमध्ये असे दोनशेहून अधिक शिक्षक गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी, विज्ञान, गणित यासह इतर सर्व विषय शिकवत आहेत. प्रत्येक तासाला दिडशे रुपये या प्रमाणे त्यांना मानधन मिळते. पेट्रोलचे दर शंभरी पार गेल्याने सध्याच्या महागाईत ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. बऱयाच शिक्षकांचे आठवडय़ातून तीन तासही भरत नाहीत. कोरोनाच्या काळात तर त्यांच्या शिकवण्यांवर मर्यादा आल्या होत्या. जेवढे तास त्यांना मिळतात तेवढेच वेतन दिले जाते. शिवाय हे वेतनही महिन्याकाठी न मिळता चार किंवा सहा महिन्यांनी हाती पडते. या शिक्षकांपैकी काही शिक्षक 15 ते 17 वर्षे तासिक शिक्षक म्हणून सेवा देत आहे. बहुतेक सरकारी शाळांमध्ये सध्या शिक्षकांच्या जागा खाली असल्याने त्यात पूर्णवेळ शिक्षक म्हणून सामावून घेण्याची त्यांची मागणी आहे. सरकारने आपल्या मांगण्यांचा तात्काळ विचार न केल्यास पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.









