2021 मध्ये शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला
अरुणाचल प्रदेशची ताशी यांगजोम चालू वर्षात माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. ताशी अरुणाचलच्या दिरांग येथील राष्ट्रीय गिर्यारोहण आणि संबंधित क्रीडा संस्थेत प्रशिक्षक आहे. तिच्या या यशाबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू आणि अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी कौतुक केले आहे. ताशी यांगजोम यांचे एव्हरेस्ट सर केल्याप्रकरणी अभिनंदन करत असल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे.
ताशी 37 वर्षांच्या आहेत. स्वतःच्या संस्थेतून मागील तीन वर्षांमध्ये एव्हरेस्ट सर करणाऱया त्या नवव्या गिर्यारोहक आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी एव्हरेस्टच्या बेसकँपपर्यंत कोरोना संक्रमण पोहोचल्याचे वृत्त आले होते, यामुळे देखील त्यांचे यश महत्त्वाचे आहे. कोरोना संकटादरम्यान त्यांची ही कामगिरी त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरते. यापूर्वी अरुणाचल प्रदेशातील तापी म्रा, टाइन मेना, अंशू जामसेनता, नीला लामा, कलडेन पालजोर, तमे बगांग, किशन तेकसेंग आणि ताक तामुत यांनी एव्हरेस्ट शिखराला गवसणी घातली होती.









