विविध गावांमध्ये धर्मवीर ज्वालेचे गांभीर्याने स्वागत : धारकऱयांकडून अभिवादन : आरती, पूजाविधीनंतर ध्येयमंत्राने बलिदान मासची सांगता
वार्ताहर /धामणे
धामणे, राजहंसगड व नंदिहळ्ळीसह तालुक्यातील विविध गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासची सांगता करण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथून धर्मवीर संभाजी महाराजांची ज्वाला प्रत्येक खेडय़ात नेण्यात आली. त्यानंतर ती प्रत्येक गावभर पदयात्रा काढून शुक्रवार दि. 1 रोजी बलिदान मासची सांगता करण्यात आली.
धामणे येथील शिवप्रतिष्ठानच्या धारकऱयांच्यावतीने गुरुवार दि. 31 रोजी छत्रपती श्री शिवाजी उद्यान बेळगाव येथून धर्मवीर छ. संभाजी महाराज ज्वाला शहापूर, वडगावमार्गे जाऊन अवचारहट्टी, देवगणहट्टी, मास्कोनहट्टी, काळम्मानगर, ब्रह्मलिंगहट्टी, धामणे येथील मरगाई मंदिरात गुरुवारी रात्री ज्वालेचा मुक्काम करण्यात आला. त्यानंतर शुक्रवार दि. 1 रोजी येथून या ज्वालेची सुरुवात होऊन धामणे गावात आली. यावेळी अनेक ठिकाणी सुवासिनींनी आरती ओवाळली. त्यानंतर ब्रह्मलिंगहट्टी येथील छ. धर्मवीर संभाजी महाराज मूर्तीसमोर विधीवत पूजन करून ध्येयमंत्राने ज्वाला शांत करण्यात आली. पदयात्रेत शिवप्रतिष्ठानचे धामणे विभाग प्रमुख नागेश पाटील, धारकरी प्रकाश रेमाणाचे, बाबू भोसले, किशोर बेळगावकर, अमित भोसले, बसवंत लोकळुचे, रुपेश बाळेकुंद्री (आर्मी), प्रशांत बाळेकुंद्री आदी सहभागी होते.
येळ्ळूर येथे ‘बलिदान मास’ची सांगता

येळ्ळूर येथे संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त हिंदवी स्वराज्य युवा संघ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने ज्वालाफेरी काढण्यात आली. यात तरुण, तरुणींनी मोठय़ा संख्येने सहभाग दर्शविला होता. ध. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त येळ्ळूर परिसरातील तरुणांनी संपूर्ण गावात सायंकाळी ज्वाला फिरविली. यावेळी ‘छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आठवा, धर्माला जागा’ असा संदेश देण्यात आला. ध्येयमंत्राने बलिदान मासची सांगता झाली.
राजहंसगड येथे बलिदान मासची सांगता

राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी उद्यान येथून येळ्ळूर, सुळगेमार्गे राजहंसगड येथे ज्वाला पोहोचल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर पूजन करण्यात येऊन पदयात्रेद्वारे ही ज्वाला गावभर फिरून गावातील सिद्धेश्वर मंदिरात धर्मवीर ज्वाला शांत करण्यात आली. या पदयात्रेमध्ये शुभम हावळ, ज्ञानेश्वर नरवडे, विशाल नावगेकर, मकरंद लोखंडे, मारुती लोखंडे, कृष्णा गडकरी आदी धारकरी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नंदिहळ्ळी येथे धर्मवीर संभाजी महाराज ज्वाला गावभर फिरून येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर ध्येयमंत्र झाल्यानंतर ज्वाला शांत करण्यात आली.
ध. छत्रपती संभाजी महाराज यांना खानापुरात अभिवादन

फाल्गुन अमावस्या, मृत्युंजय अमावस्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची दिलेली बलिदानाची आठवण ठेवून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने संभाजी महाराजांची पुण्यतिथी गांभीर्याने पाळण्यात येते. दि. 3 मार्च ते 1 एप्रिल हा कालावधी ‘बलिदान मास’ म्हणून पाळण्यात आला.
दररोज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक व पूजा करण्यात येत होती. यावेळी गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी लिहिलेल्या संभाजी हृदयाचे या श्लोकांचे पठण करण्यात येत होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने गेला संपूर्ण महिना धर्मवीर बलिदान मास पाळला. 1 एप्रिल रोजी बलिदान मासची सांगता करण्यात आली. तर 6.30 वा. संभाजी महाराज यांना अभिवादन करून आदरांजली वाहिली. प्रारंभी संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. धर्मवीर ज्वाला ग्रामदेवता रवळनाथ मंदिर येथून प्रज्वलित करून खानापुरातील मुख्य रस्त्यावरून पदयात्रा काढण्यात आली. संभाजी चौक येथे प्रेरणामंत्र झाल्यावर होमहवन करून सर्व धारकरी व शिवभक्तांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमात्मक चितेला अग्नी देऊन विधिवत पूजन करून धर्मवीर ज्वाला शांत करण्यात आली.
बलिदान मास उपक्रमात युवतींचा सहभाग
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खानापूर तालुका अध्यक्ष मनोहर गावडे यांनी बलिदान मासनिमित्त होणाऱया संभाजी महाराजांच्या अभिवादन कार्यक्रमात गेले महिनाभर खानापुरातील युवतींचा मोठा सहभाग होता. आता महिलांनीही बलिदान मास पाळावा, असे आवाहन गावडे यांनी केले.









