अफगाण सैन्याने तालिबानच्या ताब्यातील अनेक गावे केली मुक्त- चकमकीत पाकिस्तानी सैन्याधिकाऱयाचा खात्मा
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तान नॅशनल डिफेन्स सिक्युरिटी फोर्सेसने अमेरिकेच्या मदतीने तालिबानच्या ताब्यातील अनेक गावे मुक्त करविली आहेत. अफगाण सैन्याच्या या कारवाईनंतर तालिबानच्या हिंसेत पाकिस्तानी नागरिकही सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. चकमकीदरम्यान अफगाण सैन्याने पाकिस्तानी सैन्यात अधिकारी असलेल्या अनेकांना ठार केले आहे. त्यांच्या मृतदेहाजवळून पाकिस्तानी ओळखपत्रेही मिळाली आहेत.
आंतरराष्ट्रीय मदत आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमुळे अफगाण सैन्याने महामार्गाला लागून असलेल्या गावांना तालिबानच्या कब्जातून मुक्त केले आहे. हेरातमध्ये भारताच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या सलमा धरणावरील एका हल्ला हाणून पाडण्यात आला आहे.

चकमकीदरम्यान तालिबानचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. मृतदेहानजीक पाकिस्तानी ओळखपत्रे मिळाली आहेत. यातून तालिबानी हिंसाचारात पाकिस्तानचाही हात असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. संघर्षात पाकिस्तानच्या सैन्याचा अधिकारी जावेदला कंठस्नान घालण्यास अफगाण सैन्याला यश मिळाले आहे. लोगार, पकीता आणि पकतियामध्ये जावेद हा तालिबानचे नेतृत्व करत होता.
अफगाणिस्तानच्या गजनी, तकहार, कंधार, हेलमंड आणि बघलान समवेत 20 प्रांतांमध्ये अफगाण सैन्याने तालिबानला माघार घेण्यास भाग पाडले आहे. मयमाना-अकीना, हैरातन-काबूल-तोरखाम, स्पिन बोल्डक-कंधार शहर-लष्करगा आणि इस्लाम कला-हेरात महामार्ग सुरक्षित केला आहे. मजार-ए-शरीफ, जलालाबाद, कंधार, हेरातसह अनेक शहरांमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्याकडून अनेक हवाई हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये 81 तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत.
तालिबानच्या विरोधात फतवा
स्थानिक नेत्यांनी नागरिकांना तालिबानच्या विरोधात शस्त्रास्त्रs हातात घेण्याचे आवाहन केले आहे. दैकुंडीचे शिया मौलवी अयातुल्लाह वहीजादा यांनी फतवा काढत युद्धात उतरण्याचे आवाहन लोकांना केले आहे.









