प्रतिनिधी / कागल :
हिंदवी स्वराज्य स्थापन होताना अनेक जाती-धर्माच्या लोकांनी पुढाकार घेतला. म्हणूनच स्वराज्य स्थापन झाले. छ. शिवाजी महाराजांकडे जिवाला जीव देणारी माणसं होती. त्यामध्ये तान्हाजी मालुसरे हा एक महाराजांच्यावर जीवापाड प्रेम करणारा योध्दा होता. त्यांचा जाज्वल इतिहास तान्हाजी या चित्रपटातून मांडण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट पहावा यासाठी हा चित्रपट करमुक्त करण्याचा प्रयत्न करु, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, तान्हाजी चित्रपट शालेय विद्यार्थी तसेच तरुणांनी पहावा आणि त्यांच्या कार्याची माहिती व प्रेरणा घ्यावी. तान्हाजी मालुसरेंचे बालपण, जडणघडण, तरुणपण याबरोबरच राजनिष्ठा, कर्तव्य या कौतुकास्पद बाबी आहेत. प्रखर राष्ट्रनिष्ठा असलेला करारी स्वामीभक्त शूरवीर मावळा अशी सर्वदूर ख्याती होती. मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणारा तान्हाजी योध्दा होता. आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे अशी भूमिका घेऊन स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावली. अशा योद्याचा हा चित्रपट सर्वांनी पाहणे गरजेचे आहे.
राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत पाणीपत चित्रपट करमुक्त करण्याच्या चर्चा झाल्या आहेत. त्यावेळी तान्हाजी चित्रपटाच्याबाबतीत विषय झाला.मात्र त्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सर्व चित्रपटगृहांमध्ये सुरु झाला आहे. या योद्याची सर्वांनाच माहिती मिळावी, त्यांचा पराक्रम आजच्या तरुण पिढीसमोर यावा यासाठी हाही चित्रपट करमुक्त करण्यासाठी आपण मंत्रीमंडळात विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.









