हल्ली सारखी चिडचिड होते. खूप अस्वस्थ वाटतं, कामाचा ताण जाणवतो. कशा कशातच लक्ष लागत नाही. विचार तर थांबतच नाहीत. आत्मविश्वास कमीच झालाय. काही सुचत नाही. सगळे म्हणतात झालंय काय तुला? सगळी सुखं दाराशी हात जोडून तर उभी आहेत. सुख बोचतं का? सगळय़ांसाठी आजवर खूप केलं. कुणाची आजारपणं काढली, दुखलं खुपलं पाहिलं, यांची मनं डळमळली तेव्हा मीच सावरलं..माझ्या आवडीनिवडी बाजूला सारल्या. त्यांच्या सुखात सुख मानत जगले. पण आज.. आज मला काहीतरी होतंय म्हटल्यावर सगळय़ांचे चेहरे कसेनुसे.. मॅडम या नीलाला काळजी म्हणून ती घेऊन आली. मी खरंच अशी नव्हते हो.. असं म्हणत मग कितीतरी वेळ भावनांना वाट मोकळी करून देणारे हुंदके कानावर पडत राहतात. समुपदेशक म्हणून काम करत असताना हा अनुभव असंख्य वेळा येत असतो.
ताण-तणावाखाली असलेल्या कित्येक स्त्रिया भेटत असतात. एकंदरच मानसिक आरोग्याचे अनेक प्रश्न आज आपण पहातच आहोत. त्यात स्त्रियांचे मानसिक आरोग्य, ताणतणाव या संदर्भातील समस्यांचा चढता आलेख चिंताजनक आहे. खरंतर मानसिक समस्या वा प्रश्न एका रात्रीत उद्भवत नाहीत. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे अगदी सुशिक्षित असणाऱया स्त्रियांनाही जेव्हा स्वतःमध्ये काही शारीरिक वा मानसिक अशा दोन्ही पातळीवर बदल जाणवू लागतात तेव्हा अगदी सुरुवातीलाच कुणाची तरी याबाबत मदत घ्यावी असे त्यांना स्वतःलाही वाटत नाही. घरच्यांच्या या गोष्टी लक्षात येऊन त्यांनी त्याची दखल घेतली हे चित्र तर फारच दुर्मिळ.
आजही बहुतांश ठिकाणी हेच चित्र पहायला मिळते की, वेळच्यावेळी डबे करणारी, स्वयंपाक, घरच्यांच्या आवडी निवडी सतत जपणारी, घरदार टापटीप ठेवणारी, कायम हसतमुख, सर्वांच्या सेवेसी हजर असे स्त्रीचे व्यक्तिमत्त्व म्हणजे आदर्श सून, पत्नी, माता वगैरे मनावर पक्के कोरले गेले आहे. ती कितीही शिकली, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती याच्या कितीही गप्पा मारल्या तरी विशिष्ट चौकटीत राहून सगळय़ांचा विचार तिला करावा लागतो हे वास्तव आहे. संसाराच्या रामरगाडय़ात स्वतःच्या अनेक छंदाना, आवडीना मूठमाती दिली जाते, असंख्य वेळा मन मारत जगलं जातं. मग ते मन मारत जगणं, ती घुसमट त्यातून निर्माण झालेल्या विघातक भावनांची वाफ मनाच्या कोपऱयात इतकी साठत जाते की एक दिवस त्याचा स्फोट होतो. एक दिवस तिचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही धोक्मयात येते.
स्त्रियांमध्ये अनेक टप्प्यावर होणारे संप्रेरकातील बदल, दैनंदिन जीवनाची वाटचाल करत असताना करावा लागणारा ताणाचा सामना, अपेक्षा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी तिला करावी लागणारी कसरत, घर नोकरी ही डबल डय़ूटी करताना येणारा ताण या आणि अशा विविध गोष्टी तिचे मानसिक आरोग्य धोक्मयात आणण्यास हातभार लावतात.
खरंतर आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण हा शब्द परवलीचा झाला आहे. अगदी सावलीसारखा तो सर्वांच्या सोबत असतोच. ताण ही एक प्रकारची असुखकारक भावना आहे. दडपणाची जाणीव देणारी. शारीरिक, मानसिक थकवा आणणारी. ताण हीही एक अवस्था आहे. मात्र ताणाची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी जर जास्त असेल तर ते रोगाला आमंत्रण ठरू शकतं. ताणामुळे विघातक भावनांना खतपाणी मिळते आणि मानसिक अनारोग्याकडे वाटचाल होऊ लागते.
खरंतर केवळ स्त्रियांनीच नव्हे तर प्रत्येकाने आपल्या मानसिक आरोग्याबाबत सजग असणे गरजेचे आहे.
आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी आत्मसन्मान अर्थात सेल्फ-एस्टीमबाबतही सजग राहायला हवे. सेल्फ एस्टीम म्हणजेच आपली मूल्ये ठरविणे, आपल्यातील गुणक्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी जागरुक असणे आवश्यक आहे. तसेच आपल्याला जाणवणारा ताण, विविध भावना याकडे आपले लक्ष आहे का हे ही तपासायला हवे. ताणाप्रमाणेच स्वतःच्या त्रासदायक भावनांची तीव्रता, वारंवारता, कालावधी कमी करता येणे हे एक कौशल्य आहे. ‘भावनिक मोजपट्टी’ या सोप्या तंत्राद्वारे आपण स्वतः त्याचे मोजमाप करू शकतो. अशी भावनिक मोजपट्टी आपणच तयार करायची. यातील शून्य ही स्थिती (वाईटही नाही आणि चांगलेही नाही) अर्थात बॅलन्स म्हणजे समतोल स्थिती दर्शविते. यातील अधिक अंकाची बाजू ही किती चांगले वाटते आहे याकडे जाणारी आणि वजा अंकाची बाजू ही नकारात्मक विचार-भावना येणे, उदास वाटणे या गोष्टी दर्शविणारी आहे. अशी मोजपट्टी तयार करून रोज मनात डोकावून पहायचे.. आता कसे वाटते आहे हा प्रश्न दिवसातून दोन तीन वेळा तरी स्वतःला विचारायचा. भावनिक मोजपट्टीद्वारे त्याची नोंद करायची. आपली तुलना आपल्यासोबतच करायची. ही मोजपट्टी चित्रात दाखविल्याप्रमाणे करता येईल.
कधीतरी उदास वाटणे, मूड नसणे, काही नकारात्मक भावना विचार येणे हे अगदी नैसर्गिक आहे. म्हणजेच त्याची तीव्रता पाहता -1, -2 ही स्केल नैसर्गिक आहे. उदा. कोरोनामुळे वाटणारी काळजी ही स्वाभाविक आहे. कोरोना मलाही होईल का, झाला तर काय करायचे हा विचार मनात येतो. आपण समजा -1 या पट्टीवर आहोत.. ओके. परंतु त्या विचाराची, काळजीच्या भावनेची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे वाढत जात नाही ना याकडे लक्ष हवे. म्हणजे मला कोरोना होईल का हा विचार वारंवार मनात यायला लागला आणि त्याचे चिंतेत रूपांतर होऊ लागले तर आपण -3,-4 या स्केलवर जातो आहोत. ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे, विचारांची दिशा बदलणे आवश्यक आहे. हे बदलायला हवे ही जाणीव आणि वेळीच घेतलेली खबरदारी यामुळे सतत वजा बाजूला राहणे म्हणजेच औदासिन्याच्या दिशेने होणारा प्रवास टाळता येईल. म्हणजेच ज्यावेळी कमी अस्वस्थता असेल त्यावेळी वजा तीन, वजा दोन, वजा एक अशी नोंद करायची. ही नोंद व्यक्तीसापेक्ष असते. याबाबत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण सतत अधिक बाजूला असू तर भावनांची सजगता कमी आहे. कारण उदासी येणे हे नैसर्गिक आहे. वजा दोन ते अधिक पाच यामधे असणे भावनिक आरोग्याचे लक्षण आहे परंतु सतत वजा या पट्टीवर असणे हे अनारोग्याचे लक्षण आहे. ज्यावेळी आपण अशी भावनांची नोंद करायला शिकतो, आपल्या भावनिक स्थितीला क्रमांक देतो तेव्हा त्या भावनांच्या प्रवाहातून आपण स्वतःला वेगळे करतो. त्यावेळी वैचारिक मेंदू सक्रिय होतो. भावनिक बुद्धी विकसित होते. मेंदूतील मनाचा ब्रेक हे इनबिल्ट फंक्शन ऍक्टिव्ह झाल्याने भावनेच्या भरात घडणाऱया कृतींनाही थांबवता येण्याच्या दिशेने प्रवास सुरू होतो.
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583








