तटरक्षक दलाच्या दिल्ली स्टेशनचे बनले कमांडिंग ऑफिसर : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रतिनिधी/ निपाणी
भारतीय तटरक्षक दलाच्या दिल्ली स्टेशनच्या कमांडिंग ऑफिसरपदी मूळ तवंदी गावचे रहिवासी असलेले डीआयजी सुधाकर राजाराम पाटील यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर नियुक्ती झालेले या भागातील पाटील हे पहिलेच अधिकारी आहेत. जानेवारी 2020 मध्ये त्यांना तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदावर बढती मिळालेली आहे.
निपाणी नजीकच्या तवंदीसारख्या डोंगराळ, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबात वाढलेले सुधाकर पाटील यांनी सैनिक स्कूल सातारामधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांची जुलै 1994 मध्ये भारतीय तटरक्षक दलामध्ये अधिकारी म्हणून निवड झाली. नेव्हल अकॅडमी येथे त्यांनी प्राथमिक प्रशिक्षण प्राप्त केले असून, त्यांनी नौदल गुन्हे अन्वेषण आणि गुप्तवार्ता या कार्यामध्ये नैपुण्य मिळविले आहे.
डीआयजी पाटील यांनी तटरक्षक दलाच्या अनेक जहाजांवर व कार्यालयामध्ये विविध उच्च अधिकारपदे यशस्वीरित्या भूषविली आहेत. त्याचबरोबर ऑपरेशन ताशा, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम इत्यादी कारवायांमध्ये त्यांनी हिरारीने सहभाग नोंदवला आहे. त्यांनी अमेरिकेमध्ये सैन्य शिक्षा आणि प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे प्रति÷ित आंतरराष्ट्रीय मारीटाईम अधिकारी प्रशिक्षण प्राप्त केले असून, इस्रायल सेनेद्वारा आयोजित आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देखील यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
शस्त्र प्रशिक्षणामध्ये सुवर्णपदक
डीआयजी पाटील यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांनी आयएनएस कुंजाली येथे एट – आर्म्स या शस्त्र प्रशिक्षणामधे सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तसेच कोचीन येथे ते शोध आणि बचाव प्रशिक्षणात प्रथम आले आहेत. त्यांनी दिल्ली येथे सन 2015 येथे डायनॅमिक पोझिशनिंग कोर्समध्ये 97.5 … गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांनी समुद्री सेवेदरम्यान दोन जहाजांचे कमांडिंग ऑफिसरपद यशस्वीरित्या भूषविले आहे व अंदमान निकोबार येथील नव्याने उभारल्या जाणाऱया तटरक्षक दलाच्या मायाबंदर या कार्यालयाच्या विकासाचे शिल्पकार असणाऱया पाटील यांनी या अगोदर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ांचे कमांडर म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे.
विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक, प्रेरणादायी
डीआयजी पाटील यांना त्यांच्या कठीण परिश्रम, समर्पन, नेतृत्व कौशल्य आणि सैन्य सेवतील अपार योगदानासाठी सन 2011 साली महानिर्देशक भारतीय तटरक्षक यांच्याकडून तर सन 2004 साली कमांडर तटरक्षक क्षेत्र (पश्चिम) यांच्याकडून गौरवपदके मिळालेली आहेत. कठोर परिश्रम, इच्छाशक्ती व अविरत संघर्ष करून मिळालेली ही मजल ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक व प्रेरणादायी असून मराठी जनतेसाठी अभिमानास्पद व मनोबल वाढवणारी ही मानली जात आहे.









