शिक्षक मतदार संघाचे आमदार अरूण शहापूर यांचे गौरोद्गार
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी तरूण भारतने व्हीडीओच्या माध्यमातून दहावी अभ्यासमाला सुरू केली. यासाठी कर्नाटकातील मराठी माध्यमाच्या मुलांना घरबसल्या मार्गदर्शन मिळाले. याचे कौतुक थेट राज्याच्या शिक्षणमंत्र्यानीही केले. त्यामुळे तरूण भारतचा हा ‘बेळगाव पॅटर्न’ राज्यभरात हिट ठरल्याचे गौरोद्गार शिक्षक मतदार संघाचे आमदार अरूण शहापूर यांनी काढले.
शनिवारी सिटीझन्स कौन्सिलच्या सदस्यांना आमदार शहापुर यांची ठळकवाडी हायस्कूल येथे भेट घेतली. तेव्हा कौन्सिलचे अध्यक्ष सतिश तेंडोलकर यांनी तरूण भारतने तयार केलेल्या दहावी अभ्यासमाला क्हीडीओ विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी शहापूर यांनी भरभरून कौतुक करीत माध्यमांनी असे उपक्रम राबविल्यास शैक्षणिक स्तर अजून उंचावू शकतो, असे त्यांनी सांगितले.
दहावीला जाणाऱयांनाही ठरताहेत उपयुक्त
तरूण भारतने दहावी अभ्यासमालेचे 150 व्हिडीओ तयार केले आहेत. बेळगावसह कर्नाटकात शिक्षण घेणाऱया मराठी भाषिक विद्यार्थ्यांना लाकडाऊनच्या काळात शैक्षणिक माहिती पोहचविण्यात आली. 1.50 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ते व्हीडीओ पाहिले आहेत. माध्यमिक शिक्षक संघाच्या विनंतीनंतर तरूण भारतने हे व्हीडीओ तयार केले होते.
आमदार शहापूर यांनी बेंगळूर येथील बैठकीत याची माहिती शिक्षणमंत्र्यांना दिली. शिक्षण विभागाच्या सहकार्याविना शिक्षक संघ व तरूण भारतने ही अभ्यासमाला केल्याचे शिक्षणमंत्र्यांना सांगितले. मराठी माध्यमांसाठी तयार केलेल्या या व्हिडीओमुळे इतर माध्यमांनाही असे उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.









