वृत्तसंस्था/ लंडन
पुरुषांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचा धोका महिलांच्या तुलनेत अधिक असला तरीही शरीरात अँटीबॉडी निर्माण होण्याप्रकरणी ते आघाडीवर आहेत. ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणा एनएचएसनुसार कोरोनाबाधित पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत अँटीबॉडी अधिक प्रमाणात विकसित होतात. अलिकडेच यासंबंधी संशोधन करण्यात आले आहे.
कोरोना सर्वाइरचा ब्लडप्लाझ्मा बाधितांना दिल्यास अँटीबॉडी विषाणूशी लढण्यास किती सहाय्यभूत ठरते, त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्तीची पातळी किती वाढते याचा शोध घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते.
एनएचएसने अलिकडेच कोरोना बाधितांसाठी ब्लड अँड ट्रान्सप्लांट कार्यक्रम सुरू केला होता. चाचणीदरम्यान बाधित पुरुषांमध्ये 43 टक्के आणि महिलांमध्ये 29 टक्के अँटीबॉडी विकसित झाल्याचे आढळून आले आहे. एनएचएस संसर्गमुक्तांना ब्लडप्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करत आहे. या ब्लडप्लाझ्माचा वापर करून बाधितांमधील प्रतिकारशक्तीचे अध्ययन करण्याचा उद्देश आहे.
अधिक जीव वाचविणे शक्य
ब्लड अँड ट्रान्सप्लांट कार्यक्रमाचे प्राध्यापक डेव्हिड रॉबर्ट्स यांच्यानुसार सद्यकाळात प्लाझ्मा दात्यांची गरज आहे. प्लाझ्मादात्यांची तपासणी केली असता पुरुषांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. याचाच अर्थ अधिक लोकांचा जीव वाचविणे शक्य असल्याचे रॉबर्ट्स म्हणाले.
अँटीबॉडीची उपयुक्तता
संसर्गाच्या प्रारंभी संबंधिताची रोगप्रतिकारशक्ती पांढऱया पेशींच्या मदतीने विषाणू नष्ट करण्याचा प्रयत्न करते. परंतु अधिक आजारी पडल्यास रोगप्रतिकारशक्तीला विषाणू नष्ट करण्यासाठी अधिक प्रमाणात अँटीबॉडी तयार करण्याची गरज भासते. याच कारणामुळे हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्राध्यापक डेव्हिड म्हणाले.
प्लाझ्मा थेरपी

जगभरात झालेल्या अध्ययनानुसार कोविड-19 चा संसर्ग पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात होत आहे. याच कारणामुळे पुरुषांनी प्लाझ्मा पुरविल्यास बरे होण्याची शक्यता वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील आठवडय़ात कोरोनाबाधितांना ब्लड प्लाझ्मा चाचणी कार्यक्रमात सामील होण्याची सूचना करण्यात आली होती. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरल्यास ब्रिटनच्या रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा थेरपी सुरू करता येणार आहे.









