सहा महिन्यातील पहिल्याच विमानप्रवासानंतर दुबईत आगमन
वृत्तसंस्था/ दुबई
आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली बुधवारी दुबईत दाखल झाले. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 19 सप्टेंबरपासून खेळवली जाणार असून हंगामातील सलामीची लढत विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात खेळवली जाणार आहे. कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे यंदाची आयपीएल भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीत आयोजित केली गेली आहे.
सौरभ गांगुली दुबईत दाखल झाल्यानंतर पुढील 6 दिवस क्वारन्टाईन असतील आणि दि. 23 सप्टेंबरपर्यंत ते संयुक्त अरब अमिरातीत असतील, असे संकेत आहेत.
गांगुली यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन फ्लाईटमधील आपले छायाचित्र पोस्ट केले. त्यात त्यांनी मास्क व फेस शील्ड घातलेले आहे. ‘सहा महिन्यानंतरचा पहिलाच विमानप्रवास. आयपीएल स्पर्धेसाठी मी दुबईला रवाना होत आहे’, असे त्यांनी यात म्हटले होते.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियन भूमीत आयोजित आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द केली गेल्याने बीसीसीआयला यंदाची आयपीएल स्पर्धा भरवणे शक्य झाले आहे. यंदा ही स्पर्धा होऊ शकली नसती तर मंडळाला 4 हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागल असते. सध्या या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेलसह अनेक पदाधिकारी, सहायक दुबईत तळ ठोकून आहेत. चेन्नई सलामीची लढत खेळू शकणार का, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. पण, त्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे.
आयपीएलमधील भारतीय प्रशिक्षकच अधिक असावेत : कुंबळे
यंदाच्या आयपीएल हंगामात सहभागी 8 संघांमध्ये फक्त एकाच संघाचे प्रशिक्षक भारतीय आहेत आणि ते म्हणजे आरसीबीचे अनिल कुंबळे! हीच बाब हेरत कुंबळे यांनी आयपीएलमधील भारतीय प्रशिक्षकांची संख्या वाढायला हवी, असे मत व्यक्त केले आहे. सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये 8 पैकी 7 संघांचे प्रशिक्षक विदेशी आहेत. यात ऑस्ट्रेलियाचे 4, न्यूझीलंडचे 2 व श्रीलंकेच्या एका प्रशिक्षकाचा समावेश आहे.
‘भारतीय प्रशिक्षकांमध्ये बरीच गुणवत्ता आहे. पण, आयपीएलमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटताना दिसून येत नाही, असे मला स्पष्टपणे जाणवते. मला आयपीएलमध्ये अधिक प्रशिक्षक असावेत, असे वाटते आणि त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. आठपैकी केवळ एकाच संघाचा भारतीय प्रशिक्षक आहे, ही बाब आपल्या दृष्टीने अजिबात भूषणावह नाही’, असे कुंबळे याप्रसंगी स्पष्टीकरणार्थ म्हणाले.
कुंबळे आपल्या संघासमवेत दि. 20 ऑगस्टपासूनच संयुक्त अरब अमिरातीत आहेत आणि आपले सर्व खेळाडू शारीरिक, मानसिकदृष्टय़ा उत्तम आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. किंग्स इलेव्हन पंजाब संघाला आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नसून यंदा ती कसर भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
ख्रिस गेल आघाडी फळीत विस्फोटक फलंदाजी करतोच. त्याही शिवाय, युवा खेळाडूंना स्फूरण देण्याची अपेक्षा आम्हाला त्याच्याकडून आहे, असे कुंबळे यांनी यावेळी म्हटले आहे. किंग्स इलेव्हन संघातील अन्य महत्त्वाच्या विदेशी खेळाडूत ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस जॉर्डन, जिम्मी नीशम, बहरातील निकोलस पूरन, मुजीब झॅद्रन, व्हिजोएन व शेल्डॉन कॉट्रेल यांचा समावेश आहे.









