वार्ताहर/ ताम्हाने
संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर देवरुखचा आठवडा बाजार पुन्हा गजबजला आहे. तब्बल सात महिन्यानंतर आठवडा बाजार सुरु झाल्याने रविवारी येथील परिसर व्यापारी व ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला होता. आठवडा बाजार सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
संगमेश्वर तालुक्यात गेल्या काही महिन्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेवून तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱया देवरुख शहरातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय न.पं.प्रशासनाने घेतला होता. देवरुख खालची आळी परिसरात दर रविवारी बाजार भरतो. भाजी, फळ, कपडे, मसाले एकाच ठिकाणी रास्त दरात मिळत असल्याने देवरुखसह तालुक्याच्या कानाकोपऱयातून ग्राहकांची खरेदीसाठी एकच गर्दी होत असते. कोरोना काळातील खबरदारी म्हणून 22 मार्च पासून आठवडा बाजार भरवण्यास देवरुख नगरपंचायतीने बंदी घातली होती.
यानंतर देवरुख बाजारपेठेत कोरोना बाधित रुग्ण मिळून आल्याने सर्वचजण भितीच्या छायेखाली होते. एकीकडे कोरोना काळात उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यात आठवडा बाजार बंद झाल्याने आर्थिक फटकाही नागरिकांना बसत होता. त्यामुळे आठवडा बाजार सुरु होण्याची नागरिक वाट पाहत होते. तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर व नागरिकांची गरज ओळखून दसऱयाच्या शुभमुहूर्तावर रविवारपासून प्रत्यक्षात आठवडा बाजार सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत आठवडा बाजार सुरु ठेवण्यात आला होता. तब्बल सात महिन्यानंतर आठवडा बाजार सुरु झाल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी केली होती.
गेले काही महिन्यापासून तालुक्यात कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यात तालुक्यातील आरोग्य, पोलिस व अन्य प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. तालुक्यातील कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर देवरुखात रविवारी आठवडा बाजार सुरु करण्यात आला आहे. देवरुख शहरात तब्बल सात महिन्यानंतर आठवडा बाजार सुरु होणार असल्याने गर्दी होणार हे लक्षात घेवून त्या ठिकाणी पोलिस यंत्रणाही तैनात करण्यात आली होती. यावेळी मास्क न लावणाऱयांवर पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली.









