जिनिव्हात चर्चेसाठी एकत्र अमेरिका अन् रशियाचे प्रमुख
वृत्तसंस्था / जिनिव्हा
स्वीत्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात बुधवारी पूर्ण जगाला आशेचा एक किरण दिसून आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे चर्चेसाठी एकत्र आले आहेत. अमेरिका आणि रशियाचे संबंध अत्यंत खराब स्थितीत असताना आणि प्रत्येक मुद्दय़ावर केवळ आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असताना दोन्ही नेत्यांचे हस्तांदोलनाचे एक छायाचित्र समोर येणे अनेक प्रकारचे संदेश देणारे आहे. या भेटीनंतर चर्चेचे सत्र सुरू होत वाद कमी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. बायडेन-पुतीन यांच्या पहिल्या भेटीतील ंसंपूर्ण तपशील उघड केला जाणार नाही.
या भेटीच्या प्रारंभी सर्वप्रथम स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. त्यानंतर पुतीन, बायडेन, अमेरिकेचे विदेशमंत्री अँटनी ब्लिंकेन आणि रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यातील बैठक सुरू झाली. या बैठकीनंतर एक उच्चस्तरीय चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. या गुप्त बैठकीत वरिष्ठ अधिकारी सामील होणार असून ही बैठकही कित्येक तासांपर्यंत चालणार आहे.
या बैठकीत सायबर क्राईम, अमेरिकेच्या निवडणुकीतील रशियाचा हस्तक्षेप यासारख्या वादग्रस्त मुद्दय़ांवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. अध्यक्ष म्हणून बायडेन पुतीन यांच्याशी पहिल्यांदाच भेटणार आहेत. यापूर्वी 2011 मध्ये उपाध्यक्षपदी असताना बायडेन त्यांना भेटले होते.
कुठल्या मुद्दय़ांवर वाद ?
बायडेन यांच्याकडून अनेकवेळा सायबर हल्ल्यांसाठी रशियावर निशाणा साधण्यात आला आहे. तर पुतीन यांनी सातत्याने स्वतःच्या देशाचा बचाव करत सायबर हल्ल्यांमध्ये हात नसल्याचा दावा केला आहे. 2016 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाचे प्रकरण आता जुने ठरले असले तरीही याबाबत अद्याप वाद सुरू आहे. या चर्चेद्वारे दोन्ही नेत्यांदरम्यान या मुद्दय़ांवर चर्चा होणार असला तरीही तोडगा काढला जाण्याची शक्यता कमीच आहे.
तोडग्याची अपेक्षा?
आताच कुठल्याही मुद्दय़ावर तोडगा निघणे अवघड आहे, पण चर्चेचे सत्र सुरू होणे ही देखील एक मोठी कामगिरी आहे. बायडेन यांनी देखील चर्चा होणे महत्त्वाचे असल्याचे म्हणत संबंधांमधील स्थैर्याचा मुद्दा मांडला होता. आता ही बैठक हे लक्ष्य प्राप्त करण्यास किती सहाय्यभूत ठरते हे लवकरच स्पष्ट होणार असल्याचे पुतीन यांचे प्रवक्ते दमित्री पेसकोव्ह यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.








