क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
130व्या डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेत काल रविवारी खेळविण्यात आलेल्या लढतीत गतवर्षीय विजेता गोकुळम केरळ आणि आर्मी रेड संघानी विजय नोंदविले. या विजयाने तीन सामन्यांतून प्रत्येकी 7 गुणानी उभय संघांनी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात आर्मी रेड संघाने आयएसएलमध्ये खेळणाऱया हैदराबाद एफसी संघाला 2-1 गोलफरकाने पराभूत केले. आर्मी रेड संघाचे दोन्ही गोल लिटॉन शील याने 33व्या व 70व्या मिनिटाला केले. पराभूत हैदराबाद एफसीचा एकमेव गोल 35व्या मिनिटाला कौस्तव दत्ताने नोंदविला.
कल्याणी स्टेडियमवर खेळविलेल्या एका एकतर्फी लढतीत गोकुळम केरळने आसाम रायफल्स संघाचा 7-2 गोलानी पराभव केला. गोकुळम केरळच्या विजयात त्यांचा नायजेरियन स्ट्रायकर चिसॉन एल्विस चिकाताराने मोलाचा वाटा उचलताना आकर्षक हॅट्ट्रिकची नोंद केली. त्यांच्या बार्रेटोने दोन तर ओसुमानू आणि एस. दासने प्रत्येकी एक गोल केला.
पराभूत आसाम रायफल्स संघासाठी रॉजर आणि राभा यांनी प्रत्येकी एक गोल केला. आता मंगळवारी या स्पर्धेत बेंगलोर एफसी व भारतीय नौदल तसेच दिल्ली एफसी आणि केरळ ब्लास्टर्स संघात सामने खेळविण्यात येतील.









