झी युवा वाहिनी म्हणजे निखळ मनोरंजन, हे समीकरण आता सगळ्यांनाच ठाऊक झालेले आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका, मनोरंजन करणारे कथाबाह्य कार्यक्रम, यांची रेलचेल या वाहिनीवर नेहमी पाहायला मिळते. लॉकडाऊनच्या काळात, घरी बसून सगळेच कंटाळले आहेत आणि म्हणूनच झी युवा लाव रे तो विडिओ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करणार आहेत.
महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. घरबसल्या, अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करण्याची संधी, झी युवामुळे महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना मिळणार आहे. झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे सूत्रधार, डॉक्टर निलेश साबळे, आता झी युवा वाहिनीवर सुद्धा, कल्ला करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करू शकेल, सगळ्यांना पोट धरून हसायला लावेल, असं टॅलेंटचा सध्या शोध सुरु आहे. पण या कार्यक्रमाच आणखी एक खास सरप्राईज सुद्धा आहे. डॉ . नीलेश साबळेंबरोबर आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होणार आहे. आणि टॅलेंटवर त्यांची आवड निवड सांगणार आहेत. लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ, कंटाळा, वैताग या सगळ्या गोष्टींवर मात करून खळखळून हसण्यासाठी, आता आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे. लाव रे तो विडिओ या कार्यक्रमातून, महाराष्ट्रातील लोकांचे छुपे टॅलेंट जे आजवर केवळ मोबाईल किंवा इंटरनेट वर अडकले होते आता प्रेक्षकांना टीव्हीवर पाहायला मिळेल. एक आगळीवेगळी संकल्पना, प्रेक्षकांचा स्पर्धक म्हणून थेट सहभाग यामुळे, या कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे. डॉ. निलेश साबळे यांच्या खुमासदार समालोचनाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. एक बहारदार कार्यक्रम अनुभवण्याची संधी लवकरच मिळणार आहे.









