प्रतिनिधी/ चिपळूण
गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱया कोरोनाबाधितांमध्ये चक्क 6 खासगी डॉक्टर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांना कोरोना झाला कसा, त्यांनी नेमकी काय काळजी घेतली, अशा रूग्णांवर त्यांनी उपचार केलेच कसे, असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यामुळे यावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. शनिवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार 20 नव्या रूग्णांची भर पडली असून तालुक्याचा आकडा 394 वर गेला आहे.
गेल्या महिनाभरापासून येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत असल्याचे दिसून येत आहे. सुरूवातीला एका फार्मासिस्टला कोरोना झाल्यावर हे जाळे वाढू लागले. त्याच्या मेडिकलमधील कर्मचाऱयांना लागण झाल्यावर त्यातील 1 कर्मचारी गोवळकोट रोड परिसरातील असल्याने हा भाग हॉटस्पॉट ठरल्ना. येथील रूग्ण कमी होत गेल्यावर घरडा कंपनीच्या कामगारांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढवली. यामुळे खेर्डी केंद्र बनले. त्यानंतर मिरजोळी परिसरातील एका मोठय़ा रूग्णालयाला कोरोनाने विळखा घातला हा विळखा आजही तितकासा सैल झालेला नाही. या रूग्णालयाच्या 2 डॉक्टरांसह अनेक परिचारिका, सफाई कामगार, सुरक्षारक्षक बाधित झाले आहेत.
गेल्या काही दिवसांच्या रूग्णांकडे पाहिल्यास त्यात तब्बल 6 डॉक्टर आहेत. या डॉक्टरांनी आपल्या रूग्णालयांमध्ये कोरोनाच्या रूग्णांची तपासणी केल्याने ते बाधित झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मुळातच कोरोना आल्यापासून अनेक डॉक्टर गायब झाले आहेत. त्यांनी त्यांच्या नियमित रूग्णांसह नव्या रूग्णांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे नाराजी असतानाच बाधित झालेल्या डॉक्टारांनी नेमकी काय काळजी घेतली, कोरोनाची लक्षणे असलेल्या रूग्णांची तपासणी केलीच कशी, असे अनेक प्रश्न आता उभे ठाकले आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी सेवा जरूर द्यावी, पण रूग्ण मोठा आहे, नेहमीचा आहे म्हणून त्याला कोरोनाची लक्षणे असतानाही उपचार करण्याची चूक करू नये, अन्यथा या रोगाची या डॉक्टरासह त्यांच्या इतर रूग्णांना लागण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
शनिवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार 20 नव्या रूग्णांची भर पडली आहे. यात खेर्डी 8, पेढे-5, कळकवणे, खेंड, बहादूरशेखनाका, काविळतळी, ओझरवाडी येथील प्रत्येकी 1 व अन्य दोन रूग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याचा आकडा आता 394 वर गेला आहे. यातील 217 रूग्ण बरे झाले असून 166 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 203 जणांचे अहवाल येणे बाकी असून शहरासह ग्रामीण भागात 101 कंन्टेन्मेंट झोन आहेत. सध्या 104 जणांवर पेढांबे, 23 जणांवर कामथे, 12 जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगर परिषद रूग्णालयातच उपचार करा: शाह
शहरातील काही डॉक्टर किरकोळ आजारांवरही उपचार करीत नाहीत. त्यामुळे रूग्णांना कामथे येथे जावे लागते. यात होणारा त्रास लक्षात घेता नगर परिषदेच्या तेरा आरोग्य पथकांमार्फत शहरात सुरू असलेल्या सर्व्हेक्षणात ज्यांना ताप, सर्दी व अन्य किरकोळ आजार असतील अशा रूग्णांवर नगर परिषद दवाखान्यात उपचार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी केली आहे.









