मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती, डेल्टाचे गोव्यात 26रुग्ण
प्रतिनिधी /पणजी
कोविड डेल्टा व्हेरियंटचे 26 पॉझिटिव्ह रुग्ण गोव्यात आढळले असले तरीही डेल्टा प्लसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र शेजारील सिंधुदुर्ग, रत्नागिरीत कोविड डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने या संसर्गाचा गोव्यात फैलाव होऊ नये म्हणून गोवा-महाराष्ट्र हद्दीवर कडक क्रीनिंग सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
राज्यात 26 रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट स्ट्रेन
दोन महिन्यांपूर्वी राज्यातील 122 कोरोना रुग्णांचे नमुने पुणे येथील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील 26 रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट स्ट्रेनची नोंद आढळून आली होती. मात्र राज्यात अद्याप डेल्टा प्लसचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कठोर पावले उचलली असून शेजारील राज्यातून येणाऱयांकडून हा संसर्ग राज्यात पोहोचू नये याची खबरदारी म्हणून हद्दीवर कडक क्रीनिंग सुरू केले आहे.
गोव्यातही होणार व्हेरियंट चाचणी सुविधा
देशात केवळ सात ते आठ ठिकाणीच कोविडच्या विविध व्हेरियंटस्ची चांचणी करण्याची सुविधा आहे. त्यात आता गोव्याचाही समावेश होणार असून लवकरच गोव्यातही तशी सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे. डेल्टा प्लसच्या बाबतीत केंद्र सरकारकडून अद्याप वेगळी मार्गदर्शक तत्वे आलेली नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातून येणाऱयांचे होणार स्क्रीनिंग
शेजारील महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिह्यातून नोकरीसह अन्य विविध कामे तसेच आरोग्य तपासणीसाठी रोज शेकडो लोक गोव्यात येत असतात. त्यांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी सीमा भागात खाजगी तपासणी केंद्रे स्थापन करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तेथे येणाऱया प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल व एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तरच प्रवेश देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.









