फुलबाग गल्ली परिसरातील समस्या : खोदलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
फुलबाग गल्ली परिसरातील डेनेज वाहिन्या खराब झाल्याने महापालिकेच्यावतीने नव्याने घालण्यात आल्या आहेत. मात्र खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने परिसरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. दुचाकी वाहनधारक आणि पादचाऱयांना ये-जा करणे मुश्कील बनल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
फुलबाग गल्ली परिसरातील डेनेजवाहिन्या खराब झाल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. सांडपाणी पाझरून विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी खराब होत असल्याची तक्रार नागरिक करीत होते. महापालिकेने याची दखल घेऊन डेनेज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेतले. नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्याच्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने चांगली भूमिका घेतली. मात्र सदर काम करण्यात आल्यापासून दुसऱया समस्येचा सामना करावा लागत आहे. खोदाई केलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची गरज होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण करून रस्ते व्यवस्थित करण्याची आवश्यकता होती. पण ज्या कंत्राटदाराला काम देण्यात आले आहे, त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसामुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. येथील डेनेजची समस्या संपुष्टात आली. मात्र आता रस्ते खराब झाल्याने वाहनधारक आणि पादचाऱयांच्या समस्येत भर पडली आहे. रस्त्यांवर निसरड झाल्याने वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.









