युनायटेड किंगडमच्या रॉयल नेव्हीकडून गौरव
हॉलिवूड अभिनेता डॅनियल क्रेगचा ‘जेम्स बाँड सीरिज’चा पुढील चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याचदरम्यान डॅनियलला एक मोठा सन्मान मिळाला आहे. अभिनेत्याला युनायटेड किंगडमच्या रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
जेम्स बाँडने स्वतःच्या ट्विटर हँडलवर डॅनियल क्रेगचे एक छायाचित्र शेअर केले आहे. यात डॅनियल नौदलाच्या गणवेशात दिसून येत आहे. वरिष्ठ सेवेत मानद कमांडरच्या पदावर नियुक्त होऊन विशेषाधिकार प्राप्त करत अधिकच गौरवान्वित झाल्याचे डॅनियलने म्हटले आहे.
जगभरात प्रसिद्ध जेम्स बाँड सीरिजच्या नो टाइम टू डाय या चित्रपटात डॅनियल अखेरचा बाँड म्हणून झळकणार आहे. पुढील बाँडपटात नवा अभिनेता किंवा अभिनेत्री दिसून येणार आहे. तर नो टाइम टू डाय या चित्रपटात ऑस्करविजेते अभिनेते रामी मालेक हे खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.
डॅनियल क्रेग सर्वप्रथम ‘कॅसिनो रॉयाल’ या चित्रपटात जेम्स बाँडच्या भूमिकेत दिसून आला होता. त्यानंतर क्वांटम ऑफ सॉलेस, स्कायफॉल आणि स्पेक्टरमध्ये त्याने काम केले आहे.









