सर्व नद्या दुथडय़ा भरून वाहत आहेत. शासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेऊन. साखळीत पंपींग सुरूच.
प्रतिनिधी /डिचोली
डिचोली तालुक्मयात पावसाचा मारा सुरूच असून काल बुधवारीही दिवसभर पवसाने दमदार बरसात केली. त्यामुळे सर्व नद्यांमधील पाणी भरूनच वाहत होते. रात्रीच्या वेळी साखळीतील वाळवंटी नदीची पातळी काहिशी वाढल्याने बाजारातील पंप सुरू करण्यात आले होते. शिवाय डिचोली, साळ येथील नद्यांमधील पाण्याची पातळी नियंत्रणात होती. शासकीय यंत्रणा मात्र सध्याच्या पावसावर आणि पावसामुळे वाढणाऱया पाण्यावर लक्ष ठेऊन आहेत.
सध्या सततपणे पडणाऱया पावसामुळे डिचोली तालुक्मयातील सर्व नदी नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे सध्या नदी किनरी भागांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. डिचोली नदीतील पाण्याची पातळी काल बुधवारी नियंत्रणात होती. दिवसभर पडलेल्या पावसाने अधूनमधून काहीशी उसंत घेतल्याने पाण्याची पातळी जास्त वाढली नव्हती, नियंत्रणात होती. मात्र संध्याकाळी सततपणे जोरदार पाऊस लागल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाला होता.
साखळीतील वाळवंटी नदीचीही पाणी पातळी सकाळीपासून नियंत्रणात होती. सकाळीच्या सत्रात या नदीतील पाणी पातळी काहीशी घटली होती. मात्र संध्याकाळच्या सत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीतील पाणी वाढले होते. त्यामुळे रात्री साखळी बाजारात पंप सुरू करून बाजारातील नाल्यात साचणारे पाणी पुन्हा नदीत फेकण्णाचे काम सुरू होते.
साळ डिचोली येथील शापोरा नदीतील पाण्याच्या पातळीत किंचितशी वाढ झाली होती. पाणी पुलाच्या सुमारे दिड मीटर खालून वाहत होते. त्यामुळे सध्यातरी सळ गावाला पुराचा तसा कोणताही धोका नाही. तरीही उपाययोजना म्हणून डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित, जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता के. पी. नाईक व इतर अधिकारी पावसाचा आणि नद्यांमध्ये वाढणाऱया पाणी पातळीचा अंदाज घेत आहेत. संपूर्ण पुर परिस्थितीवर सध्या या अधिकाऱयांनी लक्ष ठेवले आहे.
सतत कोसळणाऱया पावसामुळे कासरपाल लाटंबार्से येथील राजेंद्र भिकारो परवार यांच्या घराची भिंत कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले. सदर घटनेचा पंचनामा करून नुकसानीचा आहवाल सादर करण्याची सुचना मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी संबंधित तलाठय़ाला केली आहे. तसेच पैरा मये येथील उत्तम राजाराम पोळे यांच्या घर आणि बारची भिंत मध्यरात्री कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले. सध्या अतीवृष्टी होत असल्याने ते खोर्जुवे येथे रहायला गेले असल्याने बचावले. या घटनेत बारमधील दारूच्या बाटल्या तसेच स्वयंपाकाचे सामान निकामी झाल्याने त्यांचे सुमारे 70 हजारांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती स्थानिक पंचसदस्य विजय पोळे, सचिव महादेव नाईक तलाठय़ांना देण्यात आली आहे.









