गेल्यावेळी विरोधात काम केलेल्यांचा यावेळी आम्हाला पाठिंबा. यावेळी डिचोलीत विजय निश्चित.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली मतदारसंघातील मगोचे उमेदवार नरेश सावळ यांनी आपला उमेदवारी अज काल सोम. दि. 24 जाने. रोजी सकाळी निवडणूक अधिकारी सागर गावडे यांच्याकडे सादर केला. आपण आमदार असतानाची पाच वर्षे आणि गेली पाच वर्षे यातील फरक डिचोली मतदारसंघातील लोकांनी अनुभवला असून डिचोलीच्या विकासासाठी यावेळी नरेश सावळ यांना विजयी करण्याचा डिचोली मतदारसंघातील मतदारांनी निर्धार केला आहे. असे यावेळी सावळ यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत नगरसेविका अँड. अपर्णा फोगेरी, अँड. रंजना वायंगणकर, सुखदा तेली, सुदिन नायक, निशांत चणेकर, अँड. संजय पळ, गटाध्यक्ष कमलाकर तेली, सुशांत पेडणेकर, गौरव परब, नरेश कडकडे श्रीपाद कुंभारजुवेकर व इतरांची उपस्थिती होती.
डिचोली मतदारसंघात वाढलेली बेरोजगारी आणि खुंटलेदा विकास या दोन महत्वाच्या मुद्यांबरोबरच मानवी विकास साधताना या मतदारसंघातील लोकांचे राहणीमान उंचावण्याचे ध्येय आपण बाळगले आहे. निवडून आल्यानंतर जनतेचा सैनिक याच नात्याने आपण काम करून पाच वर्षांत या मुख्य समस्या सोडविण्यासाठी तन मन धन अर्पण करून योगदान देणार. डिचोलीत आपण सुरू केलेल्या अनेक विकास योजना अर्धवट आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी पुढील पाच वर्षे आपणास निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करघत आहे. गेल्या निवडणुकीत आमच्या विरोधात काम केलेले लोक आज आमच्यासमवेत असून त्यांनीही या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे नरेश सावळ यांनी पुढे म्हटले.
डिचोली शहरातील विविध देवतांचे दर्शन घेत डिचोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सावळ यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.









