प्रतिनिधी/ खेड
खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटातील वळणावर उलटलेल्या डम्परमधील जांभा दगड अंगावर कोसळून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यशवंत रामचंद्र कांबळे (58, आंबेड खुर्द-संगमेश्वर), आदेश शिवराम शिवगण (26, हातिव-देवरूख) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही समता सैनिक दलाचे कार्यकर्ते असून माता रमाबाई आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी वणंद येथे जात असताना शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
यशवंत व आदेश हे दोघेजण दुचाकीने दापोली तालुक्यातील वणंद येथे माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी जात होते. कुवे घाटातील वळणानजीक आले असता जांभा दगडाची वाहतूक करणारा डंपर या वळणार अचानक उलटला. यावेळी डम्परमधील जांभा दगड या दुचाकीस्वारांच्या अंगावर पडून त्याखाली त्यांचा मृत्यू झाला. हा डंपर मंगेश अनिल साळुंखे (37, कळंबणी-वाळंजवाडी) चालवत होता. अवघड वळणावर डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उलटला. हा अपघात इतका भीषण होता की, दगडांखाली सापडून दोघांचाही चेंदामेंदा होऊन ते जागीच गतप्राण झाले.
दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सुरूवातीला त्यांची ओळख पटवणे अशक्य झाले होते. वणंद येथील त्याच कार्यक्रमासाठी मागाहून येणाऱया अन्य सहकारी अपघात स्थळी पोहचल्यानंतर या दोघांची ओळख पटवण्यात यश आले.
पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी घटनास्थळी भेट दिली. वाकवलीचे उपसरपंच दिनेश जाधव, संतोष देवरूखकर, निलेश शेठ यांच्यासह अन्य मदतकर्त्यांनी जांभा दगडाखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मदतग्रुपच्या रूग्णवाहिकेच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. अपघातामुळे मार्गावर काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंगेश अनिल साळुंखे या डम्पर चालकावर भादंवि कलम 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रकाश मोरे करत आहेत.









