ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
प्रकाशनाआधीच वादग्रस्त ठरलेल्या ‘टू मच एंड नेवर इनफ हाउ माय फैमिली क्रिएट द वर्ल्ड मोस्ट डेंजरस मैन’ या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील पुस्तकाच्या पहिल्याच दिवशी तब्बल साडेनऊ लाख प्रती विकल्या गेल्या.
ट्रम्प यांची पुतणी मेरी ट्रम्प यांनी हे पुस्तक लिहिले आहे. मेरी या सायकॉलॉजीस्ट असून, त्यांनी त्या पुस्तकात ट्रम्प विरोधी लेखन केले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आत्मपुजक आहेत. त्यांनी या बाबतीत सर्व सीमा पार केल्या असून, त्यांना आता चिकित्सात्मक उपचार घेण्याची स्थिती निर्माण झाली आहे. डोनाल्ड हे अतिशय गर्विष्ठ आणि अज्ञानी असे व्यक्तिमत्त्व आहे, असे मेरी यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
तसेच डोनाल्ड यांनी कॉलेज प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सेट परिक्षेसाठी पैसे देऊन डमी उमेदवार बसवला होता. त्यामुळेच त्यांचा प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश होऊ शकला, असा दावा मेरी यांनी केला आहे. ट्रम्प हे एका तीन वर्षाच्या मुलाप्रमाणे आहेत. नेहमी ते आपलाच घोडा दामटत असतात, असेही मेरी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या लेखनामुळेच हे पुस्तक प्रकाशनाच्या आगोदर वादग्रस्त ठरले होते.
ट्रम्प यांच्या भावाने या पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर मेरी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर न्यायालयाने या पुस्तकाच्या बऱ्याच प्रती वाचकांच्या हातात पडल्या आहेत, त्यामुळे आता यावर बंदी घालणे योग्य ठरणार नसल्याचे न्यूयॉर्कच्या पुफेकीसी स्टेट सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.
दरम्यान, सायमन अँड शुस्टर पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी या पुस्तकाच्या साडेनऊ लाख प्रती विकल्या गेल्या. हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपतीपदाच्या दावेदारीवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.









