प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुका पोलीस ठाणेस ट्रकचा अपहार झाल्याबाबत परमेश्वर जयसिंग सानप रा. शेंद्रे ता.जि. सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
या गुन्हयामध्ये तपास चालू असताना अन्य संशयितांकडे चौकशी केली असता या व्यवहारामध्ये आझिम सलीम पठाण ( मूळ रा.रहिमतपूर ता.कोरेगाव जि. सातारा ) याने ट्रक फसवणूक करून अपहार केलेचे समोर आले. तसेच त्याने अनेक अशाच प्रकारचे ट्रकांचे अपहार केलेचे समजून आल्याने आझिम पठाण याचे मागावर पोलीस होते. त्याने अनेक वेळा पोलीसांना गुंगारा देवून तो निघून जात होता. काल तो वाढे फाटा येथे एका चारचाकी वाहनातून येणार असल्याची माहिती मिळाल्याने सातारा तालुका डी.बी. पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला होता.तो आल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावर त्याच्या वाहनाचा पाठलाग करून त्याच्या वाहनास वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने वाहन न थांबवता तो अत्यंत भरधाव वेगाने वाहन पळवून पळून जात असताना त्यांचा डी.बी. पथकाने वाहनाने थरारकरित्या पाठलाग करून त्याचे वाहन थांबवून त्यास ताब्यात घेतले. त्याबाबत अधिक तपास चालू आहे.
या संबधीत अनेक तक्रारदारांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्याचे गुन्ह्याची खूप मोठी व्याप्ती असल्याचे समजून आले. इतर तक्रारदार यांना संपर्क करून संबंधित पोलीस ठाणेस तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्याबाबत इचलकरंजी पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद झालेली माहिती प्राप्त झाली आहे. तसेच त्याने इतर जिल्हयामध्ये ट्रकांचे अपहार केल्याची माहिती समोर येत आहे.