टोकियो / वृत्तसंस्था
टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिकिटांचे बुधवारी अनावरण केले गेले व याचबरोबर दुसऱया टप्प्यातील तिकीटविक्रीला प्रारंभही झाला. जापनीज पॅरा-कॅनॉईस्ट मोनिका सेरियू हिच्या हस्ते अनावरण झाले. ही तिकीटे लाल, निळा, जांभळा व हिरवा या चार रंगात छापली गेली असून जपानचे 4 हंगाम दर्शवण्यासाठी त्यांना पसंती दिली गेली.
प्रत्येक तिकीटावर कोणत्या क्रीडा प्रकाराचे ते तिकीट आहे, हे दर्शवण्यासाठी त्याचा लोगो घेण्यात आला आहे. किमोनो फॅब्रिक्सचे डिझाईन यासाठी वापरले गेले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेची तिकीटे मे 2019 पासून उपलब्ध केली गेली. आतापर्यंत 4.48 दशलक्ष तिकीटांची विक्री आतापर्यंत झाली आहे. अद्याप किती तिकीटे बाकी आहेत, याची नेमकी माहिती आयोजकांकडे उपलब्ध नाही. पण, तिकीटे 7.8 दशलक्षपर्यंत असावीत, असा अंदाज आहे.
जापनीज चाहत्यांचे पॅरालिम्पिक स्पर्धेच्या तिकिटांकडे बराच ओढा असून त्याची तिकीटविक्रीही सुरु झाली आहे. अमेरिकन रौप्यजेता पॅरा-तिरंदाज मॅट स्टट्झमन हा स्वतः पॅरालिम्पिक स्पर्धेच्या प्रसारासाठी टोकियोत दाखल झाला. ‘दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा प्रकारांना सर्वाधिक प्रतिसाद लाभेल, अशी माझी अपेक्षा आहे. मला दोन्ही हात नाहीत आणि माझ्यासारखे खेळाडू स्पर्धेत सहभागी होतील, त्यावेळी चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे’, असे मॅट याप्रसंगी म्हणाले. यंदाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा दि. 24 जुलै ते 9 ऑगस्ट व पॅरालिम्पिक स्पर्धा दि. 25 ऑगस्टपासून दोन आठवडय़ांच्या कालावधीत होणार आहे.









