राजापूर
तालुक्यातील बाकाळे येथे सागरी महामार्गावर टेम्पोने ठोकरल्याने दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रस्त्याचे काम करणाऱया परराज्यातील मजुरांची ही मुले रस्त्यालगत सावलीत खेळत असताना काळ बनून आलेल्या टेम्पोने 4 बालकांना जोरदार धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर दोन बालके गंभीर जखमी झाली आहेत. मंगळवारी दुपारी 1.30 च्या सुमारास हा अपघात घडला.
यामध्ये मृत झालेल्या बालकांमध्ये ….. यांचा समावेश आहे. तर …. ही मुले जखमी झाली आहेत. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, जैतापूर सागरी महामार्गाला जोडणाऱया बाकाळे गावातील जोडरस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी परराज्यातील काही कामगार आले आहेत. मंगळवारी दुपारी 1.30 च्या सुमारास हे कामगार रस्त्याचे काम करत असताना त्यांची लहान मुले मुख्य रस्त्यालगत सावलीत खेळत होती. दरम्यानच्या काळात सागरी महामार्गावरून जैतापूरकडून देवगडकडे जाणारा एक आयशर टेम्पो बाकाळे वाकड येथील तीव्र वळणावर आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि या टेम्पोने रस्त्यालगत खेळणाऱया चार मुलांना जोरदार धडक दिली.
या अपघातात एका 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर तीन मुले गंभीर जखमी झाली. यापैकी एक 5 वर्षाची मुलगी उपचारासाठी नेत असताना मृत्यू पावली. अन्य दोघांनाही या अपघातात गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टेम्पोने ठोकरल्यानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केले व काही अंतरावर पुढे जाऊन टेम्पो सोडून चालक पसार झाल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ नाटे पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आपल्या सहकाऱयांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून चालक पोलिसात हजर झाल्याचीही माहिती पुढे आली आहे.









