भारतातील दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सर्वसामान्य नागरिकांना सैन्यात 3 वर्षांपर्यंत काम करण्याची संधी देण्यासंबंधीच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. याचबरोबर महिंद्रा यांनी सैन्याला पत्र लिहून याची अंमलबजावणी झाल्यास टूर ऑफ डय़ुटी करून परतणाऱया तरुण-तरुणींना नोकऱयांमध्ये प्राधान्य देणार असल्याचे कळविले आहे.
भारतीय सैन्य टूर ऑफ डय़ुटी संबंधी नव्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे अलिकडेच कळले आहे. यांतर्गत तरुण, तंदुरुस्त नागरिकांना स्वैच्छिक आधारावर सैन्यासोबत जवान किंवा अधिकारी म्हणून संलग्न होत मोहिमात्मक अनुभव प्राप्त करण्याची संधी मिळणार असल्याचे महिंद्रा यांनी सैन्याला पाठविलेल्या ईमेलमध्ये नमूद पेले आहे.
समुहात नोकरी देण्याचा विचार
टूर ऑफ डय़ुटीच्या स्वरुपात सैन्य प्रशिक्षणानंतर तरुण-तरुणी कुठल्याही संस्थेसाठी अत्यंत लाभदायक ठरतील. सैन्यात निवड आणि प्रशिक्षणाच्या कठोर मापदंडांमुळे सैन्य प्रशिक्षण प्राप्त करणाऱया तरुण-तरुणींना महिंद्रा समुहात नोकरी देण्याचा विचार केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रस्तावामागील उद्देश
भारतीय सैन्य देशातील सर्वोत्तम गुणवत्तेला स्वतःच्या ताफ्यात सामील करू पाह आहे. या प्रस्तावामुळे सैन्याचा हा उद्देश पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. सद्यकळात शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे सैन्यात सामील होणाऱयांना किमान 10 वर्षांची नोकरी करावी लागते. सैन्यात याहून कमी कालावधीच्या डय़ुटीची तरतूद नाही.
तरतुदींची समीक्षा
तरुणाईसाठी अधिकाधिक आकर्षक स्थिती निर्माण करण्यासाठी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी शॉर्ट सर्व्हिस कशिमनच्या तरतुदींची समीक्षा करत आहेत. भारतीय सैन्यात कित्येक वर्षांपासून अधिकाऱयांची कमतरता भासत असल्याने कमिशनमध्ये बदलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची योजना आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनची सुरुवात किमान 5 वर्षांच्या सेवेसह झाली होती, परंतु ही योजना अधिक आकर्षक करण्यासाठी कालावधी वाढवून 10 वर्षे करण्यात आला होता.
टूर ऑफ डय़ुटी
भारतीय सैन्य सर्वसामान्य नागरिकांसाठी 3 वर्षांच्या टूर ऑफ डय़ुटीच्या प्रस्तावावर विचार करत आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास देशाच्या इतिहासातील एक मोठे क्रांतिकारक पाऊल ठरणार आहे. प्रस्तावानुसार प्रारंभी प्रयोगाच्या आधारावर टूर ऑफ डय़ुटी अंतगंत 100 अधिकारी आणि 100 जवानांना सैन्यात 3 वर्षांपर्यंतच्या कार्यकाळासाठी समाविष्ट करण्याची योजना आहे.









