वृत्तसंस्था / बेंगळूर
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचे प्रतिनिधीत्व करणारा भारताचा अव्वल फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या टी-20 प्रकारामध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे.
बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी झालेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात विराटने हा वैयक्तिक विक्रम नोंदवला. सोमवारच्या सामन्यात लखनौ विरुद्ध खेळताना विराटने 45 चेंडूत 61 धावा झळकवताना 4 षटकार आणि 4 चौकार नोंदवले. तसेच त्याने 138 स्ट्राईक रेट राखला होता. 2023 च्या आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीने आतापर्यंत तीन सामन्यात 82 धावांच्या सरासरीने तसेच 147 स्ट्राईक रेटने 164 धावा जमवल्या असून त्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 प्रकारामध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 362 सामन्यातील 345 डावात 41.11 धावांच्या सरासरीने 11,429 धावा जमवताना 6 शतके आणि 86 अर्धशतके नोंदवली असून त्याने 133.17 स्ट्राईक रेट राखला आहे. टी-20 प्रकारात विराटची नाबाद 122 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
विराट कोहलीने भारताकडून टी-20 प्रकारात खेळताना 115 सामन्यातील 107 डावात 52.73 धावांच्या सरासरीने तसेच 137.96 स्ट्राईक रेटने 4008 धावा जमवल्या असून त्यामध्ये 1 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये 34 वर्षीय विराटने सर्वाधिक धावा जमवण्याचा पराक्रम करताना 226 सामन्यातील 218 डावात 36.69 धावांच्या सरासरीने तसेच 129.54 स्ट्राईक रेटने 6788 धावा जमवल्या असून त्यात 5 शतके आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल स्पर्धेत 113 ही विराटची सर्वोच्च धावसंख्या आहे.
क्रिकेटच्या टी-20 प्रकारात सर्वंकष सर्वाधिक धावा जमवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विंडीजचा ख्रिस गेल पहिल्या स्थानावर, पाकचा शोएब मलिक दुसऱ्या, विंडीजचा अष्टपैलू किरन पोलार्ड तिसऱ्या, भारताचा विराट कोहली चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच पाचव्या स्थानावर आहेत. गेलने 463 सामन्यात 36.22 धावांच्या सरासरीने 144.75 स्ट्राईक रेटने 14,562 धावा जमवल्या असून त्यात 22 शतके आणि 88 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 175 ही गेलची सर्वोच्च धावसंख्या आहे. पाकच्या शोएब मलिकने 510 सामन्यात 36 धावंच्या सरासरीने तसेच 127.55 स्ट्राईक रेटने 12528 धावा जमवल्या असून त्यात 77 अर्धशतकांचा समावेश आहे. विंडीजच्या किरॉन पोलार्डने 625 सामन्यात 31.29 धावांच्या सरासरीने तसेच 150.51 स्ट्राईक रेटने 12,175 धावा जमवल्या असून त्यात 1 शतक आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या फिंचने 382 सामन्यात 33.80 धावांच्या सरासरीने तसेच 138.53 स्ट्राईक रेटने 11392 धावा जमवल्या असून त्यात 8 शतके आणि 77 अर्धशतकांचा समावेश आहे. 172 ही फिंचची सर्वोच्च धावसंख्या आहे.









