दुबई / वृत्तसंस्था
सनरायजर्स हैदराबादचा जलद गोलंदाज टी. नटराजनला कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले असून यामुळे त्याच्याशी थेट संपर्कात आलेल्या 6 सदस्यांना आयसोलेट केले गेले. मात्र, यानंतरही दिल्ली-हैदराबाद यांच्यातील लढत पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणेच होईल, असे बीसीसीआयने म्हटले होते. 30 वर्षीय नटराजनने आयपीएलमध्ये खेळलेल्या 24 सामन्यात 20 बळी घेतले आहेत.
डावखुरा जलद गोलंदाज नटराजन गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतला होता. मात्र, आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो तत्काळ खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. नटराजन स्वतःहून आयसोलेट झाला आहे आणि अन्य सर्व खेळाडूंची पहाटे 5 वाजता चाचणी घेतली गेली, त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असे बीसीसीआयने यात स्पष्ट केले.
नटराजनच्या थेट संपर्कात आलेल्या विजय कुमार (संघ व्यवस्थापक), शाम सुंदर जे (फीजिओथेरपिस्ट), अंजना वणन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक्स मॅनेजर), पेरियासमी गणेशन (नेट बॉलर) यांना यावेळी आयसोलेट केले गेले. आयपीएलच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरप्रमाणे नटराजनला 10 दिवस आयसोलेट व्हावे लागेल आणि बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जाण्यापूर्वी दोनवेळा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असणे भाग असणार आहे. टी. नटराजनला कोरोनाचा संसर्ग होणे सनरायजर्स हैदराबादसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी, आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातही तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. अगदी त्यावेळी देखील वरिष्ठ यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला कोरोनाची बाधा झाली होती.









