कुडाळ : सरताळे ता. जावळी येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत शिपायाने दारुच्या नशेत टीसीएलचा डबल मारा केला. हे पाणी पिल्यामुळे गावातील 30 ते 35 जणांना उलट्या आणि जुलाबाची बाधा झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सरताळे येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारुच्या नशेत गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत एक किलो टीसीएल पावडरच्या ऐवजी संपूर्ण पिशवीच विहिरीमध्ये खाली केली. दुसऱ्या दिवशी नित्यनियमाने गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतून घराघरात हे पिण्याचे पाणी पोहचले. हे पाणी पिल्याने गावातील 30 ते 35 नागरिकांना याची बाधा झाली. काहींना जुलाब तर काहींना उलट्या सुरू झाल्या. या संदर्भात तपासणी केली असता हा सर्व प्रकार दूषित पाणी पिल्याने झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, वाई, पाचवड आणि सातारा येथील रुग्णालयात बाधित व्यक्ती सध्या उपचार घेत आहेत तर काही जण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
दरम्यान, हा सर्व प्रकार ग्रामसेवकाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे घडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत.









