क्रीडा प्रतिनिधी /मडगांव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज वास्कोच्या टिळक मैदानावर गुणतालिकेत तळाला असलेल्या ओडिशा एफसीसमोर अव्वल स्थानी असलेल्या मुंबई सिटी एफसीचे आव्हान आहे. दोन्ही संघांनी विजयी ट्रकवर परतण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ओडिशा एफसीला मागील चार सामन्यांत तीन पराभव पाहावे लागले आहेत.
ओडिशा एफसीला शेवटच्या लढतीत त्यांना हैदराबाद एफसीकडून 1-6 असा मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. 8 सामन्यांतून 10 गुण प्राप्त केलेल्या ओडिशाचा बचाव दुबळा ठरला आहे. यंदाच्या हंगामात त्यांनी प्रतिस्पर्धी संघावर 14 गोल केले असून त्यांच्यावर 20 गोलांची नोंद झाली आहे. त्यातच एका सामन्याची बंदी असल्याने त्यांचे प्रशिक्षक किको रॅमिरेझ यांना बाहेर बसावे लागणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत आमच्या अनंक वैयक्तिक चुका झाल्यात आणि त्या आम्हाला महागात पडल्या. मात्र, अमुक एका खेळाडूला दोष देण्यात अर्थ नाही. पराभवासाठी आणि कोचिंग स्टाफ आणि त्यानंतर खेळाडू जबाबदार असल्याचे मी मानतो, असे ओडिशा एफसीचे सह-प्रशिक्षग किनो गार्सिया यांनी म्हटले आहे. पराभवाची मालिका खंडित होईल. प्रतिस्पर्धी मुंबई सिटी एफसीने पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. तो कडवा प्रतिस्पर्धी आहे. मात्र, मागील दोन सामन्यांत त्यांनाही लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. आम्ही त्यांचा चांगला अभ्यास केला आहे. त्यामुळे मुंबई सिटीशी आम्ही दोन हात करण्यास उत्सुक असल्याचे किनो गार्सिया म्हणाले.
यंदाच्या स्पर्धेतील पहिला टप्पा गतविजेता मुंबई सिटी एफसीच्या नावे राहिला. 8 सामन्यांतून 5 विजय व एक बरोबरीमुळे 16 गुणांनी मुंबई पहिल्या स्थानावर आहे तसेच सर्वाधिक विजयांची नोंदही त्यांच्या नावावर आहे. मात्र, डेस बकिंगहॅम यांच्या प्रशिक्षणाखालील मुंबई एफसीचा मागील दोन सामन्यांत कस लागला. आठव्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने त्यांना 3-3 असे बरोबरीत रोखले तर त्यापूर्वी त्यांना केरळ ब्लास्टर्सने तीन गोलांनी पराभूत केले.
मागील दोन सामन्यांतील खराब खेळातून बोध घेत विजयीपथावर परतण्याचे आमचे लक्ष्य आहे. आमचा यापुढेही आक्रमक खेळावर भर राहिल. मात्र, आम्हाला आमचा बचाव अधिक मजबूत करावा लागेल असे बकिंगहॅम म्हणाले. मुंबई सिटीच्या सांघिक कामगिरीत त्यांच्या बिपीन सिंगचे मोठे योगदान आहे. त्यांचा इगोर अँगुलोही जबरदस्त फॉर्मात आहे.









