लॉकडाऊनमुळे दीड वर्षात पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान
वार्ताहर/ कराड
कोरोनाच्या दुसऱया लाटेतून दिलासा मिळाल्याने राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथीलता देत बाजारपेठांसह 50 टक्के उपस्थितीत मंगल कार्यालयांना परवानगी दिली आहे. मात्र अद्याप नाटय़गृहासह सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी कायम आहे. कराड शहर व परिसरातील सांस्कृतिक, कला, करमणूक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील कार्यक्रमांचे मुख्य व्यासपीठ असलेले टाऊन हॉल दीड वर्षांपासून अद्याप बंदच आहे. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर टाऊन हॉल बंद असल्याने परिसरातील अनेक कार्यक्रम खोळंबले आहेत.
कराड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) मध्ये एरव्ही रोज नाटक, राजकीय कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, सामाजिक कार्यक्रम व विविध संस्था-संघटनांच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र मार्च 2020 मध्ये कोरोना संकट सुरू झाल्यामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे टाऊन हॉलही बंद करण्यात आला. शासकीय कार्यक्रम वगळता अन्य सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी असल्याने नेहमी कार्यक्रमांनी गजबजलेल्या टाऊन हॉलमध्ये दीड वर्षापासून सन्नाटा पसरला आहे.
टाऊन हॉलमधील मुख्य हॉलसह, नवीन लहान हॉल, तळमजल्यावरील कलादालन असे विभाग आहेत. या माध्यमातून पालिकेला दर महिन्याला सरासरी दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र दीड वर्षापासून टाऊन हॉलमधील सर्वच हॉल बंद असल्याने पालिकेचे 25 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. याउलट टाऊन हॉल बंद असला, तरी दर महिन्याला येथील वीज बिल सरासरी एक लाख रुपयांच्या घरात येते. पालिकेच्या वतीने टाऊन हॉल व परिसराची नियमित साफसफाई व देखभाल करण्यात येत आहे. पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊनमध्ये तीन ते चार महिन्यांची सूट देण्यात आली होती. या काळात काही कार्यक्रम पार पडले. मात्र दुसऱया लाटेत पुन्हा लॉकडाऊन झाल्याने टाऊन हॉलही पुन्हा बंद करावा लागला.
सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्याने 50 टक्केच्या उपस्थितीत मंगल कार्यालयातील लग्न व राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र राज्यातील नाटय़गृहांना अद्याप परवानगी नसल्याने टाऊन हॉल अद्याप बंदच आहे. यामुळे कराड शहरासह तालुक्यातील अनेक कार्यक्रम खोळंबले आहेत. अनलॉक होऊन टाऊन हॉल सुरू होईल, या आशेवर अनेक कार्यक्रमाचे आयोजक कच्चे बुकींग करीत आहेत.
कलादालन दीड वर्षापासून बंदच
टाऊन हॉलच्या तळमजल्यावर असलेल्या कलादालनात वर्षभर कपडय़ांचे सेल, अथवा विविध प्रकारची प्रदर्शन भरवली जातात. मात्र दीड वर्षापासून लॉकडाऊन असल्याने टाऊन हॉलमधील कलादालन विभागही बंद आहे. वास्तविक बाजारपेठांतील कापड दुकानांना परवानगी मिळाली असली, तरी येथील कपडय़ांचे सेल अद्याप बंदच आहेत.









