ऑनलाईन टीम / मुंबई :
‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘अग्गंबाई अरेच्चा’, ‘गृहदेवता’, ‘बायको माहेरी जाते’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अविट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. वासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 89 वर्षांच्या होत्या.
मागील 60 वर्षांपेक्षा अधिक काळ त्या कलाविश्वात सक्रीय होत्या. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये रेखा कामत यांचं शालेय शिक्षण झालं. रेखा आणि त्यांची बहीण चित्रा यांनी शाळेत असतानाच नृत्याचे आणि गायनाचे प्रशिक्षण घेतले होते. नृत्यनाटिकेमुळे दोन्ही बहिणींना थेट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. 1952 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा यांचा पहिला चित्रपट. यामध्ये चित्रा यांनीसुद्धा काम केले होते. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रिमूर्तींचा हा सिनेमा होता.
‘एकच प्याला’, ‘संशयकल्लोळ’, ‘भावबंधन’ यांसारख्या संगीत नाटकांमधून तसेच ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमाच्या गावे जावे’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘सुंदर मी होणार’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘दिवा जळू देत सारी रात’ यांसारख्या व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या.