अध्याय तेरावा
भगवंत म्हणाले की, ज्याला आशा आकांक्षा सोडायच्या आहेत त्यानं मी सांगतोय तसं वागावं. सर्व विश्व मीच व्यापलेले असल्याने समोर दिसणारा संसार मिथ्या आहे असे समजावे. मिथ्या म्हणजे समोर प्रत्यक्ष दिसत असला तरी निरर्थक आहे हे जाणून आहे त्यात समाधानी रहावे. हे साध्य होण्याकरिता सर्व आशा सोडून, वाणीने मौन धारण करावे आणि देहव्यापार आवरून धरावेत. वेदशास्त्रांचा पसारा सोडून देऊन, तोंडाच्या वादाची रिकामी बडबड बंद करावी. आशेचे मूळ समूळ उच्छेदन होईल अशी भगवंताची दृढ भावना ठेवावी. काया, वाचा आणि मन यांना आवरून धरावे. आत्मस्वरूपाचे लक्ष सुटू देऊ नये. त्या स्वरूपाच्या सुखात गुंतले असता स्वतःच्या देहाचा विसर पडतो. अहंकारासह मनच लुप्त होऊन जाते. आणि परिपूर्ण स्वानंद भरून वाहू लागतो. तेथे देव आणि भक्त हा भेदभावही शिल्लक राहात नाही. त्यामुळे सुखस्वरूप असा एक मीच आहे, अशा आत्मानुभवातच मग्न राहता येतं. माझ्या भक्तांना संसारातील मिथ्यत्व समजले म्हणजे असा लाभ होतो. तुम्ही कदाचित् असे म्हणाल की, संसार मिथ्या आहे असे लक्षात आल्याने तो आपला रात्रंदिवस लाकडासारखाच पडून राहात असेल, तर तसे घडत नाही. तो मनात कोणताही हेतु न बाळगता देहामध्ये वागत असतो. तो प्रारब्धानुसार आहार, निद्रा इत्यादि देहाची सर्व स्वाभाविक कर्मे करीत असूनही मी कर्ता आहे असे त्याला वाटत नाही. कुंभाराने दांडा काढून नेला तरी, आधीच्या गतीनेच ते चाक फिरत राहाते, त्याप्रमाणे प्रारब्धाच्या संस्काराप्रमाणे देह कर्मानुसार वागत असतो किंवा कुंभाराच्या चाकावर माशी बसली, तर ती न हालताही त्या चाकाबरोबर फिरते. त्याप्रमाणेच मुक्ताच्या हातून देहकर्मे होत असतात. अशा प्रकारे देहकर्म करत असताना ज्ञाता असतो त्याला मी कर्ता नाही हे खात्रीपूर्वक माहीत असल्याने तो कधीही मी कर्म केले असे म्हणत नाही. व्यावहारिक दृष्टय़ा तो स्वतःहून काहीच करत नसतो. म्हणून त्याच्याहातून घडणारे कर्म आपसूक घडते असे म्हंटले तरी चालेल. ज्याप्रमाणे वाऱयाच्या स्वभावामुळे गळून पडलेल्या पानालाही चपलता आलेली दिसते, तशी त्याची कर्मे पूर्वसंस्काराप्रमाणे चालत असतात. प्रत्येकाला स्वतःची सावली दिसत असली तरी माणूस त्या सावलीमध्ये बसू शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञात्या मनुष्याचा देह कर्म करताना दिसत असतो, परंतु तो देहाच्या दोषाने मलीन होत नाही. आपल्याच सावलीत आपण बसू लागलो तर ती सावली नाहीशी होते. त्याप्रमाणे माझ्या भक्तांनी मायेला पाहिले की, माया स्वभावतः मिथ्या असल्यामुळे पळून जाते. ज्ञानी असणे ही अमुक एका समाजाची मक्तेदारी नसल्याने, त्याचा जन्म अधम किंवा उत्तम योनीत झालेला असो, लोकांमध्ये तो वंद्य असो की निंद्य असो, त्याने काहीही फरक पडत नाही. अत्यंत ज्ञानसंपन्न असल्यामुळे, ज्ञानी मनुष्य देहालाच मिथ्या समजतो आणि जशी असेल तशी परिस्थिती सहजी स्वीकारून तो पुढे जात असतो. त्याचा देह प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी तोडला, किंवा लांडगे, वाघ, इत्यादिकांनी फाडला किंवा अग्नीमध्ये धडधडा पेटवला, तरी त्याला देहाच्या अहंतेचे भानच असत नाही. देहाची होळी झाली तरी ज्ञाता हा आत्मज्ञानाच्या योगाने भीत नाही. न बिभेती कदाचनेती अशी त्याची मनःस्थिती असते. भगवंत पुढे म्हणाले, आता कदाचित् तुम्ही विचाराल की, ज्ञानी मनुष्य देहाच्या संगतीत असतो, देहाच्या मदतीने सर्व व्यवहार पार पाडत असतो, तरीही त्याला देहाची अहंता कशी बाधत नाही ? आपल्या अंगचा खारटपणा सोडून देऊन मीठ वागू लागले तर ते उरेल तरी कसे ? किंवा हिंग आपला वास सोडून देऊन सुवासिकपणाने राहणार कसा ? अंगांत असलेले सारेच पाणी टाकून केळ जिवंत कशी राहील ? मी युद्ध करीत नाही असे म्हणून लढाईत शिरले तरी ज्याप्रमाणे मस्तकावर घाव हे पडावयाचेच, त्याप्रमाणे देहाच्या संगतीने वागले तर देहाची अहंता आपणाला काही सोडावयाची नाही. या शंकेचे भगवंतानी दिलेले उत्तर पाहूयात पुढील भागात ..
क्रमशः







