प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या लढय़ात सहभागी झालेल्या अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांना जोल्ले उद्योग समूह (एकसंबा) यांच्यावतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. श्रीनगर येथील जिल्हा बालभवन कार्यालयाच्या आवारात शनिवारी हा कार्यक्रम झाला. माजीमंत्री शशिकांत नाईक यांच्या हस्ते यावेळी सुमारे 1000 छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोना रोखण्यासाठी अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्या भर उन्हात आपली सेवा बजावत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. कोरोनाबाबत जागृतीचे कामही त्यांच्याकडून होत आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन तपासणीचे कार्य करण्यात येत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्या कार्य करत असून त्यांच्यासाठी विमा योजना सेवा सुरक्षितता पुरवावी यासाठी राज्य सरकारकडे आपण मागणी करणार असल्याचे यावेळी माजीमंत्री शशिकांत नाईक यांनी सांगितले.
सीडीपीओ रेवती होसमठ, डॉ. राजेश नेरती, रवी हिरेमठ, सदानंद कलारकोप, अशोक दानवाडे, डॉ. सिद्धार्थ पुजेरी, मोहन कोटीवाले यांच्यासह जोल्ले उद्योग समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.









