कोल्हापूर प्रतिनिधी
दख्खनचा राजा श्री जोतिबा चैत्र यात्रा यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार आहे. तसेच या वर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध भाविकांना नाहीत. यंदा दहा लाखापेक्षा जास्त भाविक वाडी रत्नागिरी येथे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 16 एप्रिल रोजी चैत्र यात्रेचा मुख्य दिवस पार पडणार आहे.
यंदा चैत्र यात्रेमध्ये बाहेरून येणाऱ्या अन्नपदार्थांच्याबाबत कडक नियम असणार आहेत. बाहेरून येणाऱ्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलधारकांना अन्न परवाना असणे आवश्यक आहे. तसेच स्टॉलधारकांना, व्यापाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस असणे बंधनकारक असणार आहे. तसेच यंदा मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुलालाची उधळण ही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुलालापासून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी डोंगरावरील गुलालाची तपासणी होऊनच विक्रीसाठी ठेवण्यात येईल. अशी माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच लवकरच याबाबत नियमांचे पत्रक काढण्यात येईल. अशी माहितीही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.