लंडनमध्ये एका जोडप्याने स्वतःच्या विवाहाकरता अनोखा मार्ग पत्करला. त्यांनी हा विशेष दिवस हायस्पीड ट्रेनमध्ये स्वतःच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत साजरा केला आहे. प्रत्यक्षात हे जोडपे परस्परांना ट्रेनमध्येच भेटले होते आणि ट्रेनमधून प्रवास करणे त्यांना अत्यंत आवडते. लॉरा डेल आणि जेन मॅग्नेट यांनी पहिल्यांदा भेटण्यासाठी रेल्वेनेच प्रवास केला होता. याचमुळे त्यांनी विवाह देखील त्याच मार्गावरील रेल्वेत केला आहे.
स्पर्धेद्वारे जिंकली संधी
जोडप्याला हा अनोखा विवाह करण्याची संधी एका स्पर्धेद्वारे मिळाली आहे. याकरता अवंती वेस्ट कोस्ट सर्व्हिसने एक स्पर्धा आयोजित केली होती. यात 150 जणांना मागे टाकत या जोडप्याने ही संधी प्राप्त केली आहे.

2 वर्षे करावी लागली प्रतीक्षा
पण जेन आणि लॉराला विवाहासाठी 2 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. कोरोना महामारीमुळे यात विलंब झाला. वेस्ट कोस्ट लाइन अत्यंत गर्दीची आहे. हा मार्ग लंडन आणि ग्लासगोला बर्मिंगहॅम, लिव्हरपूर, मँचेस्टर आणि एडिनबर्ग यासारख्या शहरांशी जोडतो.
फुलांनी सजविलेली रेल्वे
लंडन यूस्टनमध्ये जोडप्याने सर्व पाहुण्यांसोबत शॅम्पेन रिसेप्शन केले, त्यानंतर जोडपे आणि विवाहाकरत आलेले 18 पाहुणे फुलांनी सजविलेल्या रेल्वेत दाखल झाले. पाहुण्यांमध्ये डेलच्या बहिणी सामील होत्या.
रेल्वे-थीमचा केक
जोडप्याने रेल्वेत विवाह करण्यासोबतच रेल्वे-थीम असलेला केकही कापला आहे. रेल्वेतच वेडिंग ब्रेकफास्टची व्यवस्था करण्यात आली होती. मी रेल्वेप्रवासाची मोठी चाहती आहे. रेल्वेत विवाह करणे स्वप्नपूर्ती होण्यासारखे आहे. मी आणि जेनने कुटुंबीय आणि मित्रांसोबत हायस्पीड रेल्वेत विवाह करून हा दिवस अधिकच संस्मरणीय केला असल्याचे लॉरी म्हणाली.
कर्मचारीवर्गही उत्साही
हा अविश्वसनीय स्वरुपात रोमांचक आणि मनाला भिडणारा अनुभव होता. हा विवाह आमच्या पूर्ण टीमसाठी अत्यंत विशेष राहिल्याचे उद्गार अवंती वेस्ट कोस्टच्या ग्राहक विषयक विभागाच्या कार्यकारी संचालिका नताशा ग्रिस यांनी काढले आहेत.









