केरवडे त. माणगावच्या सुपुत्राचे यश : ‘जेईई ऍडव्हान्स’मध्ये आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण
वार्ताहर / घावनळे:
मूळ कुडाळ तालुक्यातील केरवडे त. माणगाव (भोईचे केरवडे) येथील व सध्या परेल-मुंबईस्थित स्वयम शशांक चुबे याने जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय जेईई मेन परीक्षेत (आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षा) खुल्या गटात देशात प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच जेईई ऍडव्हान्स परीक्षेतही तो आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
स्वयमचे आजोबा सुरेश चुबे मुंबई महानगरपालिकेत महापौरांचे सचिव म्हणून कार्यरत होते. स्वयमचे शिक्षण मुंबईत झाले. त्याने दहावीत बालमोहन विद्यामंदिरमधून (दादर) 94 टक्के, तर नारायणा कॉलेज (अंधेरी) मधून बारावीत 93 टक्के गुण मिळविले. आयआयटी ही जागतिक दर्जाची संस्था असून यात प्रवेश मिळणे कठीण असते. ठराविक विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. त्याने मिळविलेले यश उल्लेखनीय आहे. परेल-मुंबई येथील डॉ. शशांक चुबे व दादर-मुंबई येथील डेंटिस्ट क्लिनिकच्या डॉ. नैना चुबे यांचा तो मुलगा, तर कुडाळ येथील बालरोगतज्ञ डॉ. अमोघ चुबे यांचा तो चुलत पुतण्या होय. स्वयमच्या या यशाबद्दल केरवडे ग्रामस्थ व हितचिंतकांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.









