कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठामध्ये येत्या जूनपासून फिल्म मेकिंग (चित्रपटनिर्मिती) हा अभ्यासक्रम . विद्यापीठाच्या मराठी विभागात सुरू होत आहे. अशी माहीती अधिसभा सदस्य श्रीनिवास गायकवाड व कला तरंगचे अध्यक्ष आणि कार्यकारी निर्माता विशाल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूरमधून चित्रपटनिर्मिती तर सांगलीला नाटयपंढरी असे संबोधले जाते. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयांना सांस्कृतिक वारसा आहे. अनेक चित्रपटांची निर्मिती या तीन जिल्हयात झालेली आहे. तसेच अनेक मराठी, हिंदी चित्रपटात या भागातील अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. यामुळे चित्रपट निर्मितीमध्ये करियर करण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पुणे, मुंबई याच बरोबर राज्याच्या बाहेर ही जातात. तीच संधी जर शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण झाली तर अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. याच उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये या विषयी ठराव सुद्धा मांडण्यात आला. हा कोर्स 6 ते 8 महीन्याचा असून, 12 वी नंतर 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणाबरोबरच कुशल रोजगारनिर्मितीबरोबरच रेकॉर्डिंग स्टुडिओ, डबिंग स्टुडिओ, व्हिडीयो एडिटिंग, आदी माहिती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रणधीर शिंदे या कोर्स संदर्भातील पुढील नियोजन करत आहेत. याप्रसंगी कुलगुरू डॉ डी.टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉ. पि. एस. पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्याच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे बरेच बदल घडून येत आहेत त्यामुळे हा चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने विद्यापीठाला नवीन ऊर्जा देणारा ठरेल असे विशाल कुलकर्णी आणि श्रीनिवास गायकवाड यांनी सांगितले.









