प्रतिनिधी / कणकवली:
कणकवली पोलिसांनी 21 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 ते 10 च्या सुमारास जुगार खेळताना छापा टाकला. त्यावेळी 14 ते 16 जणांना पकडूनही केवळ चारचजणांना आरोपी करण्यात आले. उर्वरितांना आर्थिक तडजोडीने सोडण्यात आल्याची चर्चा आहे. लाखो रुपयांची रक्कम असताना छाप्यात ती कमी दाखविण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मनसेतर्फे पोलीस उपअधीक्षकांजवळ करण्यात आली आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr, उपतालुकाध्यक्ष शांताराम सादये, तालुका सचिव संतोष कुडाळकर यांनी याबाबतचे निवेदन पोलीस उपअधीक्षक कार्यालात दिले आहे. रेल्वे स्टेशनसमोर ज्या परिसरात हा छापा टाकण्यात आला, तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास नेमकी माहिती समोर येऊ शकते. यात 10 जणांना आर्थिक तडजोडीने सोडण्यात आल्याची चर्चा असून छाप्यात रक्कमही कमी दाखविण्यात आली आहे. अशाच प्रकारे कणकवली शहरासोबतच साकेडी, तळेरे, फोंडा, तळेरे-विजयदुर्ग आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अंदर-बाहर जुगार सुरू असून त्यावरही कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.









