डीआयसीची घ्यावी लागणार परवानगी : कारखान्यात 50 टक्के कर्मचाऱयांची मर्यादा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावमधील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठय़ा प्रमाणात जीवनावश्यक वस्तू व साहित्याची निर्मिती केली जाते. परंतु लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे कारखाने बंद ठेवण्यात आले होते. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीला ब्रेक लागल्याने हे कारखाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बुधवार दि. 19 पासून 50 टक्के कामगारांना घेऊन हे उद्योग सुरू केले जाणार आहेत.
बेळगावसह राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. दि. 10 मेपासून 24 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामध्ये उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कामगारांना कारखान्याच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु हे शक्मय नसल्याने 10 मेपासून बेळगाव जिल्हय़ातील उद्योग बंद ठेवण्यात आले होते.
परंतु यातील बरेच उद्योग अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती करीत असल्याने तेही बंद करावे लागले होते. परंतु आता हे उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे उद्यमबाग येथील जिल्हा औद्योगिक केंद्राची (डीआयसी) परवानगी घ्यावी लागणार आहे. कार्यालयात किंवा डीआयसीच्या मेल आयडीवर मेल करून परवानगी घ्यावी लागणार आहे. दि. 19 मेपासून हे उद्योग सुरू केले जाणार आहेत.
कामगारांना ये-जा करण्यासाठी डीआयसीच्या परवानगी पत्राची झेरॉक्स व ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. डीआयसीकडे उद्योजकांनी पत्र दाखल केल्यानंतर त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. कंपनीकडून आलेल्या ऑर्डर लेटरसह इतर कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यानंतर लगेचच त्यांना परवानगी देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा औद्योगिक अधिकारी दोड्डबसवराजू यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.









