राजेंद्र शिंदे /चिपळूण :
महाडमधील सावित्री पूल दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर गेली तीन वर्षे कोकणातील महामार्गावरील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले. यामध्ये चिपळुणातील वाशिष्ठी आणि संगमेश्वरमधील शास्त्री पूल अतिधोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे पुणे येथील स्टक्ट सोर्स इंजिनिरीयरिंगच्या माध्यमातून या पुलांचे ‘स्पेशल स्ट्रक्चरल ऑडीट’ होणार आहे. यामध्ये पुलाच्या पिलरच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पाणबुडय़ांचीही मदत घेतली जाणार आहे.
कोकणातून जात असलेल्या या महामार्गावरील सर्वच पूल ब्रिटिशकाळात बांधलेले आहेत. त्यापैकी बहुसंख्य पुलांचे आयुष्य अभियांत्रिकीच्या निकषांनुसार यापूर्वीच संपुष्टात आले आहे. महाड येथे सावित्री पूल दुर्घटनेत 42 जणांचा बळी गेल्यानंतर महामार्गावरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातून महामार्गावरील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियातर्फे घेण्यात आला. त्यानुसार ध्रुव कन्सल्टन्सीकडून फेब्रुवारी 2017 पासून सतत तीन वर्षे महामार्गावरील पुलांची तपासणी केली जात आहे. 18 मोठय़ा पुलांसह एकूण 72 पुलांची तपासणी केल्यानंतर त्यातील 21 पुलांच्या दुरुस्तीच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र महामार्ग चौपदरीकरणात नवीन पुलांचा समावेश असल्याने जुन्या पुलांवर खर्च कशाला, असा प्रश्न उपस्थित करत रस्ते विकास मंत्रालयाने या पुलांच्या दुरूस्तीकडे काहीसे दुर्लक्ष केले. दरम्यान चौपदरीकरणात होणारे नवे पुलही अर्धवटच राहिल्याने दुर्लक्षित जुन्या पुलांवरूनच वाहतूक सुरु आहे.
या तपासणी अहवालामध्ये शास्त्री आणि वाशिष्ठी नदीवरील दोन पुलांचा समावेश आहे. 1939 मध्ये महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पुलाचे काम सुरू होऊन 1943 मध्ये पूल वाहतुकीस खुला झाला. स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये पुलांचे मजबुतीकरण, फाऊंडेशन दुरुस्ती, तळ भागाकडील स्लॅब स्टील दुरुस्ती, गनॅटिंग, जॅकेटिंग आदी दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. वाशिष्ठी पूल दुरूस्तीसाठी त्यावेळी 1 कोटी 87 लाखाचे अंदाजपत्रकही करण्यात आले होते. मात्र नवीन पुलाची उभारणी सुरू असल्याने आणि तो वर्षभरात होईल असे नियोजन असल्याने या पुलाची दुरूस्ती केली गेली नाही. तीच परिस्थिती शास्त्री पुलाबाबतीतही घडली.
दरम्यान सद्यास्थितीत शास्त्री आणि वाशिष्ठी हे दोनच पूल धोकादायक असल्याचा अहवाल आल्याने आता या पुलांचे स्पेशल स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे येथील स्टक्ट सोर्स इंजिनिरीयरिंग या एजन्सीची नेमणूक करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी या एजन्सीच्या अधिकाऱयांनी दोन्ही पुलांची प्राथमिक पहाणी केली आहे. येत्या चार दिवसांत पुलांचे बांधकाम किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी ‘हॅमर टेस्ट’ केली जाणार आहे. नेहमी करण्यात येणाऱया तपासणीपेक्षा यावेळची तपासणी पूर्णतः वेगळी असेल. वरपासून खालपर्यंत प्रत्येक भागाची स्वतंत्र तपासणी करून त्यानुसार दुरूस्ती सुचवली जाणार आहे. खांब जुने झालेले असल्याने पाणबुडय़ांद्वारे त्याच्या मुळाशी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. याचा विस्तृत अहवाल लवकरात लवकर दिला जाणार आहे.









