सौंदत्ती तालुक्मयातील महिलेला कोरोना, बाधितांची संख्या 312 वर
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या तीन महिन्यांमध्ये बेळगाव जिल्हय़ातील 23 हजार 511 जणांची स्वॅबतपासणी करण्यात आली असून यामध्ये 20 हजार 390 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर जिल्हय़ातील 312 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी सिंगारकोप्प (ता. सौदत्ती) येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने शनिवारी रात्री जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. याबरोबरच जिल्हय़ातील 24 हजार 807 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले असून 9 हजार 420 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
शनिवारी कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात कोरोनाबाधितांची भर पडली आहे. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार केवळ 24 तासांत 918 जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये बेंगळूर शहरातील 596 जणांचा समावेश आहे. तर हेल्थ बुलेटिनमध्ये सिंगारकोप्प (ता. सौंदत्ती) येथील 22 वषीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे. या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 312 बाधितांपैकी 299 जण कोरोनामुक्त झाले असून सिव्हिलमध्ये सध्या 20 जणांवर उपचार करण्यात येत आहे.
शनिवारी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 22 वषीय महिलेची माहिती घेण्यात येत आहे. या महिलेला कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली, हे स्पष्ट झाले नाही. आपण घरातच होतो, अशी माहिती बाधित महिलेने आरोग्य विभागाला दिली आहे. मात्र अधिकाऱयांनी मिळविलेल्या माहितीनुसार ती महिला मिरजेला एका लग्न समारंभासाठी गेली होती. या माहितीची खातरजमा करण्यात येत आहे.
आतापर्यंत 2 हजार 273 जणांनी 14 दिवसांचे तर 12 हजार 594 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. परराज्यांतून येणाऱया चाकरमान्यांची संख्या वाढल्यामुळे साहजिकच बाधितांची संख्या वाढती आहे. 14 दिवसांच्या होमक्वारंटाईनमध्ये असणाऱया 9420 जणांची स्वॅबतपासणी अद्याप व्हायची आहे.
आरोग्य विभागाने बेळगाव शहर व जिल्हय़ात सरसकट स्वॅब जमविण्याचे काम हाती घेतले आहे. प्रयोग शाळेला पाठविण्यात आलेल्या 2 हजार 292 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. काही प्रकरणांत कोरोनाची बाधा कशी झाली? याचा उलगडा होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.









