9 हजारहून अधिक ई-अर्ज वेटींगवर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांकरिता पोलीस दलामार्फत ऑनलाईन पास दिले जात आहेत. रत्नागिरी जिल्हय़ात आतापर्यंत 1 हजार 463 पास दिले गेले आहेत. आणखी 9 हजार 500 अर्ज विचाराधीन आहेत, याबाबत पडताळणी करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हय़ाच्या शहरी भागात दुचाकीसह सर्वच वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी अधिकृत ई- पासद्वारे वाहतुकीस अनुमती देण्यात आली आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळाव्यात यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र या सुविधेचा काहीजण गैरफायदा घेताना आढळून येत आहेत.
काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवा घरपोच पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची नावे मागवण्यात आली. त्यासाठी काही पासदेखील देण्यात आले मात्र काही स्वयंसेवकांकडूनही या पासचा वापर विनाकारण केला गेल्याचे पोलिसांना लक्षात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी पूर्ण पडताळणी करूनच पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवेचा पासचा अनावश्यक वापर झाल्यास पोलीस दलामार्फत कडक कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली आहे. तब्बल 9 हजार 500 लोकांचे ई अर्ज अद्याप पोलिसांच्या विचाराधीन आहेत. या अर्जाची पोलिसांकडून सखोल पडताळणी केली जात आहे. ज्यांना खरच अत्यावश्यक सेवेसाठी पास गरजेचे आहे त्यांनाच ई पास दिला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.









