सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ तालुक्यात मुसळधार : परुळेत ढगफुटी : वेंगुर्ल्यात सर्वाधिक 141 मि.मी. पाऊस
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून शनिवारी रात्री व रविवारी मालवण, कुडाळ, सावंतवाडी वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. तर जिह्यातील इतर तालुक्यातही पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 24 तासात वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक 141 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात सरासरी 74.875 मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी 1934.150 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. त्याबरोबर शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. मात्र, काही भागात अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली गेली आहे. दोन गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होता. मात्र, शनिवारी रात्रीपासून पुन्हा जोर वाढला. त्यामुळे पावसाचा जोर कायम आहे. मालवण, वेंगुर्ले तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आला होता. गावातील छोटय़ा पुलावर पाणी येऊन वाहतूक बंद होती. तसेच घरांचीही पडझड झाली आहे
ढगफुटीने पूरस्थिती
कुडाळ तालुक्याच्या ग्रामीण भागात रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने ओढे-नाले यांना पूर आले. काही ठिकाणी पूल व रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली. परुळे आणि परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास ढगफुटीसारख्या झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण उडवली. शनिवारी दिवसभर कडकडीत उन पडले होते. रात्रीपासून पावसाने सुरूवात केली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ढगफुटीसारखा पाऊस कोसळू लागला आणि काही काळातच पूरस्थिती निर्माण झाली.
शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले तालुक्यात सर्वत्र पूर आला. नद्या, ओहळ दुथडी भरून वाहत होते. पुराचे पाणी भातशेतीत घुसल्याने मोठे नुकसान झाले. वेंगुर्ले-मालवण मार्गावर केळुस येथे तर वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावर होडावडा येथील पुलावर पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक बंद होती. रविवारी सकाळी अकरानंतर पावसाने उसंत घेतली. अणसूर निळगावडेवाडी येथे रविवारी दुपारी पुराचे पाणी शेतीबागायतीसह वस्तीजवळ घुसल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.
शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत दहा तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावातील भातशेती पाण्याखाली जाऊन शेतकऱयांचे नुकसान झाले. तळवणे बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. लगतच्या शेतीचेही नुकसान झाले. माजगाव खालचीआळी येथील भातशेती पाण्याखाली गेली. या मार्गावरील वाहतूक रविवारी काही तास बंद ठेवण्यात आली. मळगावकडे जाणाऱया घाटीत दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बंद होती. वनविभागाचे कर्मचारी व पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर आलेली दरड व झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. त्यानंतर काही तासांनी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. दोडामार्ग 33 (1837), सावंतवाडी 134 (2051), वेंगुर्ले 141 (1970.20), कुडाळ 115 (1837), मालवण 72 (2437), कणकवली 46 (1895), देवगड 48 (1735), वैभववाडी 10 (1711) असा पाऊस झाला आहे.
तुळसमध्ये दोघांना जीवदान
तुळस : येथील नदीपात्रालगतच्या पुराच्या पाण्यातून वाहून जाणाऱया दोन युवकांना
ग्रामस्थांनी प्राण वाचविले. ही घटना रविवारी दुपारी घडली. दीड वाजण्याच्या सुमारास तुळस नदीच्या दुतर्फा पुराने रौद्ररुप धारण केले होते. तुळस-फौजदारवाडी येथील शुभम परब व चुडजीवाडी येथील दिनेश चुडजी हे दोघे पुराच्या पाण्यात वाहत असल्याचे जकातनाक्मयावरील हरी तांबोसकर व सौरभ सावंत यांनी पाहिले. या दोघांनी आपला जीव धोक्मयात घालून सदर दोन्ही युवकांना पाण्यातून बाहेर काढले.









