प्रतिनिधी/ सातारा
दोन महिन्यात जिल्हय़ातील मसूर, वडूज, पुसेसावळी या तीन ठिकाणी दरोडे टाकून वृद्धांसह कुटुंबीयांना मारहाण करत दागिने, रोकड पळवणाऱया दरोडेखेरांच्या टोळीच्या अखेर सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सिंघम स्टाईल कामगिरी करत पाच दरोडेखोरांना जेरबंद करत हिसका दाखवला. पोलिसांच्या हिसक्याने दरोडेखोरांनी जिल्हय़ातच अन्य पाच ठिकाणी केलेल्या घरफोडय़ांची कबुली दिली आहे.
दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने दरोडेखोरांकडे कसून चौकशी सुरू ठेवली असून जिल्हय़ातील आणखी काही घरफोडय़ा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुसेसावळीत मारहाण करून लुटले होते दागिने
पुसेसावळी (ता.खटाव) गावच्या हद्दीत 5 जानेवारी 2022 रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या आरोपींनी संजय कदम यांच्या घरात घुसून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 5 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरोडय़ाच्या या घटनेने पुसेसावळी परिसर हादरला होता. या घटनेचा तपास करण्याचे आव्हान जिल्हा पोलिसांपुढे होते. 5 जानेवारीपासून आजपर्यंत जिल्हा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दरोडेखोरांच्या मागावर होते. दरोडेखोरांचा पत्ता लागत नसतानाच 2 मार्च 2022 रोजी कराड तालुक्यातील मसूर येथे याच पद्धतीने दरोडेखोरांनी दहशत माजवली.
मसूरच्या वारे कुटुंबीयांवरही दहशत
पुसेसावळी येथील दरोडय़ाचा तपास लावण्यात पोलिसांना यश येत नसतानाच कराड तालुक्यातील मसूर येथे 2 मार्च 2022 रोजी पहाटे पावणेदोन वाजता दरोडेखोरांनी संतोषीमातानगर येथे दहशत माजवली. सशस्त्र आलेल्या दरोडेखोरांनी पूजा वारे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून वारे कुटुंबातील निवृत्त डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीस बेदम मारहाण केली. डॉ. संपत इराप्पा वारे व सौ. अनिता संपत वारे हे दाम्पत्य दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाले दरोडेखोरांनी पूजा वारे यांच्यासह त्यांच्या पती नितीराज व शेजारील घरातील वृद्ध महिलेस धमकावत घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 4 लाख 89 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. जिल्हय़ात सलग दुसऱयांदा पडलेल्या दरोडय़ाच्या घटनेने पोलिसांसमोरील आव्हान वाढले होते. जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी तपासाची सूत्रे हातात घेत वेगवेगळी पथके पाचारण केली.
दरोडेखोर पुढे…पोलीस मागे
पोलिसांकडून दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू असतानाच जिल्हय़ात 11 मार्च रोजी वडूज (ता.खटाव) येथे रात्री 2.45 वाजण्याच्या सुमारास शिवाजी भिकू ननावरे यांच्या घरात घसून दरोडेखोरांनी मारहाण करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 5 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जबदस्तीने चोरून नेल्याने गुन्हा दाखल झाला. दरोडेखोरांचे कारनामे वाढत असतानाच पोलिसांनीही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी जंग जंग पछाडले.
स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कामगिरी
जिल्हय़ातील पोलीस दरोडेखोरांच्या मागावर असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने दरोडेखोरांचे धागेदोरे शोधत त्यांचा पाठलाग सुरू केला. अत्यंत गोपनीयता ठेवत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा रचला. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळय़ात अडकले. अविनाश उर्फ काल्या सुभाष भोसले (वय 24), अजय सुभाष भोसले (वय 22) सचिन सुभाष भोसले ( वय 21, हे तिघे रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), राहुल उर्फ काल्या पदू भोसले (वय 28, रा. वाळुंज, पो. बाबुर्डी, ता. जि. अहमदनगर), होमराज उद्धव काळे (वय 25, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) हे संशयित कर्जत जि. अहमदनगर तसेच आष्टी जि. बीड येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक 14 रोजी कर्जत जि. अहमदनगर येथे पोहचले. या पथकाने दरोडेखोरांवर पाळत ठेवत त्यांच्या हालचालीवर नजर ठेवली. त्यांनी पाच संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले.
टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येणार
पकडलेल्या संशयितांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत आत्तापर्यंत वडूज, पुसेसावळी तसेच मसूर येथील दरोडय़ाच्या गुह्यांसह वडूज येथील दहिवडी अशा प्रत्येकी 1 घरफोडी अशा एकूण 5 गुह्यांची कबुली दिली आहे. याच टोळीने जिल्हय़ात आणखी काही ठिकाणी चोऱया केल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.









