तीन नर्सच्या दुसऱया अहवालासह एकूण 17 पॉझीटीव्ह
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात आणखी 17 अहवाल पॉझीटीव्ह आलू असून कोरोनाबाधीतांनी शंभरी पार केली आहे. या 17 अहवालांमध्ये 14 नवे रूग्ण असून तीन नर्सचा दुसरा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाग्रस्तांची संख्या 106 झाली आहे. नव्या रूग्णांमध्ये रत्नागिरीतील दोन ट्रेनी नर्सचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हयातील पहिला रूग्ण सापडलेल्या शृंगारतळीत 4 नवे रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मंगळवारी रात्रीपासून मिरज येथून 82 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 66 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 16 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्याचबरोबर सायंकाळी 21 अहवाल निगेटीव्ह आले असून एका नर्सचा दुसरा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील 6 रूग्ण असून त्यामध्ये धामापूर 2, कोळंबे 2, भिरकोंड 1 व कसबा येथील एकाचा समावेश आहे. गुहागरमधील श्रुंगारतळीत 4, रत्नागिरी तालुक्यातील कर्ला व धामणसे येथे प्रत्येकी 1 व 2 नर्सचा समावेश आहे.
संगमेश्वरमधील रूग्णसंख्या 17 वर
तालुक्यात 6 नवे रूग्ण सापडल्याने कोरोनाबाधीतांची एकूण संख्या 17 वर पोहचली आहेत. यामधील चौघांना यापुर्वीच डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे आता उपचाराखाली असलेल्या रूग्णांची संख्या 13 झाली आहे.
बाधीत नर्सेसची संख्या 8
जिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेली प्रशिक्षणार्थी नर्सचा 8 मे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यानंतर नर्सिग होस्टेलमधील तिच्या 19 सहकारींना क्वारंटाईन करण्यात आले होते. यामधील 10 मे रोजी एक, 11 रोजी 2, 13 व 14 ला प्रत्येकी एक प्रशिक्षणार्थी नर्स पॉझिटीव्ह आढळली होती. बुधवारी 5 नर्सचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत्. यात दोन नव्या नर्सचा समावेश आहे, तल तीन जुन्या नर्सचे दुसरे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे बाधीत नर्सची संख्या 8 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली आहे.
सर्वाधिक रूग्ण रत्नागिरी तालुक्यात
बुधवारी सापडलेल्या 4 रूग्णांमुळे रत्नागिरी तालुक्यात आता सर्वाधिक म्हणजे 24 रूग्ण झाले आहेत. यामध्ये 7 जण बरे होऊन घरी परतले असून 17 जण उपचाराखाली आहेत. धामणसे येथे नव्यानेच रूग्ण सापडला असून कर्लामध्ये दुसरा रूग्ण आढळला आहे.
जिल्हय़ातील रूग्ण संख्या
रत्नागिरी 24
मंडणगड 23
दापोली 19
संगमेश्वर 17
खेड 07
गुहागर 07
चिपळूण 06
लांजा 02
राजापूर 01
एकूण 106
नवे रूग्ण 14
उपचाराखाली 70
बरे झालेले 33
मृत्यू 03









